वरळी कोळीवाड्यातील टॉयलेटमध्ये होतेय स्वयंचलित सॅनिटायझेशन; देशातील पहिलाच प्रयोग

1208

कोरोना रोखण्यासाठी सर्वोत्तम असणार्‍या उपायांमधील निर्जंतुकीकरण प्रक्रिया प्रभावीपणे करण्यासाठी पालिकेच्या जी-साऊथ विभागातील वरळी कोळीवाडा येथील सार्वजनिक शौचालयात स्वयंचलित सॅनिटायझेशन केले जात आहे. यामध्ये दर अर्ध्या तासाने स्वयंचलित यंत्रणेच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण होत आहे. केवळ मुंबई, महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील हा पहिलाच अभिनव प्रयोग आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार ही यंत्रणा सुरू करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

पालिकेच्या जी-साऊथ म्हणजेच वरळी, लोअर परळ परिसरात कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले आहेत. यामध्ये यांत्रिकी पद्धतीने निर्जंतुकीकरण, प्रभावी क्वारेंटाइन, परिणामकारक कंटेनमेंट झोनची पुनर्रचना, घरोघरी जाऊन होणारी तपासणी, वॉर्डमध्ये फिरणारी एक्स रे व्हॅन, एनएससीआय डोम आणि पोदार रुग्णालयातील कोरोना हेल्थ सेंटरमध्ये तपासणीसाठी येणार्‍यांपासून डॉक्टरांचा संपर्क येऊ नये, लागण-प्रसार होऊ नये यासाठी ‘सेफ्टी फोन बुथ’ उपक्रमासह कोरोनाबाधितांवर दर्जेदार उपचार यामुळे कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या वाढली असल्याचे सहायक आयुक्त शरद उघडे म्हणाले. याशिवाय प्रत्येक रुग्णाशी डॉक्टरांकडून साधण्यात येणारा थेट संवाद, योगा, लाफ्टर शो यामुळेही रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

वरळीत बाराशेहून जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले

पालिकेच्या जी-साऊथ विभागात आतापर्यंत आढळलेल्या एकूण 2050 रुग्णांपैकी तब्बल 1194 रुग्ण 30 मेपर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे केवळ 856 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या आणखी वाढणार आहे. यामध्ये महत्त्वाच्या भागांपैकी वरळी कोळीवाड्यात 108, जिजामाता नगर 91, प्रभादेवी 113, वरळी बीडीडी चाळ 154, लोअर परळमध्ये 86 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.

ग्रोथ रेट सर्वात कमी

जी-साऊथ विभागात आठवड्याचा कोरोना पेशंट ग्रोथ रेट मुंबईत सर्वात कमी म्हणजेच 2.8 असून मुंबईचा सरासरी ग्रोथ रेट 4.5 पर्यंत आहे. राज्याचा डबलिंग रेट सरासरी 15 दिवस असताना जी-साऊथ विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 25 दिवस आहे. जी-साऊथ विभागात पुनर्रचनेनंतर सध्या 14 कंटेनमेंट झोन आणि 190 इमारतींचे भाग सील आहेत. तर 104 इमारतींमध्ये गेल्या 14 दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नसल्याने त्या सीलमुक्त करण्यात आल्या आहेत.

95 वर्षांच्या वृद्धेचीही कोरोनावर मात

या विभागात कोरोनामुक्त होणार्‍यांमध्ये दोन महिन्यांच्या मुलापासून 95 वर्षीय महिलेचाही समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये 40 वर्षांपेक्षा कमी वय असलेले 40 टक्के रुग्ण आणि 40 वर्षांपेक्षा जास्त वय असेले 60 टक्के रुग्ण आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या