मुंबईचा निकाल वाढला, कोकण नंबर वन; बारावीतील गुणवंत वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

लॉकडाऊनमुळे पेपरतपासणीच्या कामात अनेक अडचणींचा सामना करीत अखेर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुरुवारी बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर केला. राज्याचा एकूण निकाल 90.66 टक्के लागला असून यंदा निकालात 4.78 टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबईचा निकालही यंदा वाढला आहे. राज्यभरातील 7 हजार 344 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 4 हजार 470 एवढी होती. कोकण विभागाने यंदाही निकालात आघाडी घेतली असून संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. या निकालातही मुलींचेच वर्चस्व आहे.

राज्यातील 16 हजार 720 विद्यार्थ्यांना स्पोर्टस कोट्याचा लाभ मिळाला आहे. यातील सर्वाधिक विद्यार्थी पुणे विभागातील आहेत. पुण्यातील 3 हजार 458 विद्यार्थ्यांना स्पोट्र्स कोट्यातील वाढीव गुण मिळाले आहेत. त्याखालोखाल मुंबई 3 हजार 434, नाशिक 2 हजार 142, कोल्हापूर 2 हजार 74, नागपूर 1 हजार 578, अमरावती 1 हजार 272, संभाजीनगर 1 हजार 61, लातूर 992 आणि कोकणातील 709 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

3,861 कॉलेजचा 100 टक्के तर 71 कॉलेजचा शून्य टक्के निकाल
राज्यातील 3 हजार 861 कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे. ही संख्या यंदा वाढली आहे. गेल्या वर्षी 2 हजार 95 कॉलेजचा निकाल 100 टक्के इतका लागला होता. यंदा विज्ञान शाखेच्या 2 हजार 318, कला 589, वाणिज्य 867 आणि 87 व्यावसायिक कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर विज्ञानच्या 20, कला 31, वाणिज्य 19 आणि एका व्यावसायिक कॉलेजचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

मुंबईतील सर्वाधिक विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये
राज्यातील तब्बल 1 लाख 43 हजार 441 विद्याथ्र्यांना 75 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी डिस्टिंक्शन मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 2 हजार 552 एवढी होती. इतर विभागीय मंडळांच्या तुलनेत मुंबई विभागातील सर्वाधिक विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. मुंबईतील 43 हजार 370 विद्यार्थ्यांना 75 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्याखालोखाल पुणे विभागातील 27 हजार 974, अमरावतीतील 16 हजार 76 विद्याथ्र्यांना 75 टक्के पेक्षा जास्त गुण आहेत.

विभागनिहाय निकाल टक्केवारी
कोकण 95.89
पुणे 92.50
कोल्हापूर 92.42
अमरावती 92.09
नागपूर 91.65
लातूर 89.79
मुंबई 89.35
नाशिक 88.87
संभाजीनगर 88.18