
सामना प्रतिनिधी । मुंबई
आपल्या पोलीस ठाण्याची हद्द नसेल तर पोलीस कर्मचारी दुसऱ्या हद्दीतील काम करण्याचे टाळतात. पोलीस दलातील हे तसे रोजचेच चित्र. पण खेरवाडी पोलीस ठाण्याच्या महिला कॉन्स्टेबल मनीषा विसपुते या त्याला अपवाद ठरल्या आहेत. रात्रपाळीची ड्युटी संपत आली असताना त्यांना एक पोलीस अंमलदार अस्वस्थ अवस्थेत रस्त्याच्या कडेला बसलेला दिसला. त्या अंमलदाराच्या छातीत दुखत असून त्यांना उपचाराची आवश्यकता असल्याचे कळताच विसपुते यांनी वेळ, हद्द कसलाही विचार न करता त्या अंमलदाराला हॉस्पिटलमध्ये नेले.
मनीषा विसपुते या खेरवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. 9 तारखेला त्या रात्रपाळी मोबाईल-5 या गाडीवर नवीन चालक म्हणून होत्या. 10 तारखेला सकाळी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वांद्रे रेल्वे ब्रिजजवळ त्या ऍण्टी चेन स्नॅचिंग पॉइंटवर ड्युटीवर असताना सकाळी साडेआठच्या सुमारास एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला अस्वस्थ बसलेली असल्याचे विसपुते यांच्या नजरेस पडली. त्यामुळे त्यांनी विचारपूस केली असता ती व्यक्ती आरे पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल किरण काळे असून त्यांच्या छातीत दुखत असल्याचे समोर आले. मरोळ येथील सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचेही काळे म्हणाले. मग मनीषा विसपुते यांनी रिलीव्हर आलेला नाही, रात्रपाळी केलीय, हद्दीबाहेर कसे जायचे असा कोणताही विचार न करता वरिष्ठांच्या कानावर ही बाब घालून त्या स्वतःच्या मोबाईल-5 या गाडीतून काळे यांना सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. मनीषा यांच्या जिगरबाज कामगिरीमुळे काळे यांना वेळीच उपचार मिळाल्याने त्यांच्यावरील संकट टळले. नवीन वाहन चालक म्हणून त्या काम करीत होत्या. मात्र तरी त्यांनी हिंमत दाखवून काळे यांना मरोळपर्यंत नेले.

























































