
नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या ‘लालबागचा राजा’च्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोने -चांदीच्या अलंकारांचा लिलाव गुरुवारी करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही या लिलावाला भाविकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या लिलावातून तब्बल सवा कोटी रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.
यंदाच्या लिलावात सर्वांचे लक्ष वेधले ते सवा किलो सोन्याच्या मोदकाने. बाप्पाचा हा मोदकरूपी प्रसाद आपल्याला मिळावा यासाठी भाविकांमध्ये चढाओढ सुरू होती. एका भाविकाने या मोदकासाठी तब्बल 60 लाख 3 हजार रुपये मोजले. याशिवाय 17 तोळे सोन्याचा हार एका भाविकाने साडेआठ लाख रुपयांना खरेदी केला. बाप्पाला भाविकाने अर्पण केलेल्या एका दुचाकीचादेखील 77 हजार रुपयांना लिलाव करण्यात आला.





























































