मुंबईत बिबट्याची दहशत, मालाडमधील रहिवासी सोसायटीत मुक्त संचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये बिबट्याने दर्शन दिले आहे. तर काही भागात बिबट्याने पाळीव प्राण्यांची शिकार केल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. मुंबईच्या मालाड परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत बिबट्याची दहशत पाहायला मिळाली. बिबटय़ा सोसायटीच्या आवारात मुक्त संचार करताना सीसीटीव्हीमध्ये दिसल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

मालाड पूर्वेला रहेजा हाईट्स ही उच्चभ्रू सोसायटी आहे. आज पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या डी विंग परिसरातील पार्ंकग लॉटमध्ये बिबट्या फिरताना दिसला. हा बिबटय़ा सीसीटीव्हीमध्ये पैद झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पाळीव प्राणी किंवा भटक्या कुत्र्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने हा बिबटय़ा परिसरात फिरत असावा असा अंदाज स्थानिकांनी वर्तवला आहे. मात्र बिबटय़ाच्या मुक्त संचारामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन व वन विभागाने बिबटय़ाचा तातडीने बंदोबस्त करून त्याला जेरबंद करावे आणि रहिवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिक रहिवासी विजयकुमार बोरा यांनी केली आहे.