दुसर्‍या दिवशी ‘लोकल’कल्लोळ..! आधीच लोकलला गर्दी आणि त्यात रेल्वे पासांची चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन महिन्यांच्या अंतरानंतर सोमवारपासून सुरू झालेल्या उपनगरीय लोकलवर पहिला दिवस गोडी गुलाबीने ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळत गेला होता. परंतु संध्याकाळच्या गर्दीने दुसर्‍या दिवशीचे चुणूक दाखविली होती आणि लगोलग मंगळवारी जागोजागी उसळलेल्या गर्दीने ‘सोशल डिस्टन्सिंग’चे संकेत उधळले. पहिल्या दिवशी साठ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याचे दावे केले जात होते. मंगळवारी दुसर्‍यादिवशी लोकलच्या क्षमतेपेक्षा जादा गर्दी झाली, तसेच रेल्वे बोर्डाने लॉकडाऊनमुळे रेल्वे पासांचे ‘जितके दिवस वाया गेले, तितक्या दिवसांची मुदतवाढ’ देण्याचा निर्णयही जाहीर केल्यामुळे जुने पास आणून त्यांची मुदत वाढविण्याच्याही रांगांची भर पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

रेल्वेने रेल्वे पासांची मुदत वाढविण्यास सुरूवात केली आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेने ट्वीटरवरून घोषणा केली, आणि त्याची अंमलबजावणीही देखील सुरू झाली. मुंबईकर लोकलचा प्रवास करताना तीन महिन्यांचा किंवा थेट वार्षिक पास काढत असतात. त्यामुळे बचत तर होतेच शिवाय वारंवार रांगा लावण्याच्या त्रासातून सुटका होते. त्यामुळे चौकशीकरीता तिकीट बुकींगच्या खिडक्यांवर गर्दी उसळली. पहिल्यादिवशी प्रमाणे दुसऱ्या दिवशी देखील अत्यावश्यक सेवेतील सरकारी कर्मचार्‍यांची ‘ओळखपत्रे’ पाहूनच त्यांना स्थानकांत सोडण्यात आले.

‘क्यूआर’ कोडवाला ई-पास दिला नाही

अनेक कर्मचार्‍यांना कार्यालयातूक ‘क्यूआर’ कोडवाला ई-पास दिला नसल्याने असे करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. सरकारी कर्मचार्‍यांना तिकीट काढून प्रवास करण्याची अनुमती दिल्याने खिडक्यांवर प्रचंड गर्दी झाली होती. तसेच केवळ ओळखपत्र दाखवूनच रेल्वे पासांना मुदतवाढ करण्यात येत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

तातडीने बुकींग विण्डोंमध्ये वाढ

लोकल सेवा सुरू होण्याच्या दुसर्‍याच दिवशी मंगळवारी सकाळी लोकल पकडण्यापूर्वी तिकीट खिडक्यांवरच रांगा लागल्याचे चित्र होते. बहुतेकांचे रेल्वे पास संपले असल्याने जर्नी कार्ड तिकीट विकत घेणार्‍यांची संख्या जास्त होती. मध्य रेल्वेच्या काही स्थानकांतील तिकीट खिडक्यांवर ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळले जात चालविल्याने तिकीट खिडक्यांची संख्या तातडीने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

डोंबिवली उत्पन्नातही फास्ट

मध्य रेल्वेच्या मार्गावर लोकल सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशीची 15 जूनची आकडेवारी बाहेर आली असून त्यानूसार डोंबिवलीत सर्वाधिक 940 सिझन तिकीटे म्हणजे रेल्वे पास विकले गेले. तसेच 446 जर्नी म्हणजे कार्ड तिकीटे विकली जाऊन डोंबिवलीतून पहिल्या दिवशी सर्वाधिक 3 लाख 27 हजार 590 रूपये मिळाले. त्यानंतर बदलापूर येथून 322 जरी रेल्वेपास  विकले असले तरी जर्नी तिकीटे सर्वाधिक 1,187 विकली गेल्याने बदलापूरचे उत्पन्न 1 लाख 94 हजार 690 झाले. टिटवाळा येथून 349 सिझन तिकीट विकले जाऊन जर्नी तिकीटे 158 विकली गेली. त्यामुळे टिटवाळ्याला 1 लाख 18 हजारांचे उत्पन्न मिळून ते तिसरे सर्वाधिक उत्पन्नाचे स्थानक ठरल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.