सर्वांसाठी लोकल लवकरच!, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

मुंबईत लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरू करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला मुख्य सचिव संजय पुमार,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषपुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल,  आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह  यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून लॉकडाऊनमध्ये मुंबईची लोकल सेवा बंद होती. त्यानंतर जूनपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी लोकलसेवा सुरू करण्यात आली. मात्र, अजूनही सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा बंद आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने लोकलसेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्याची मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या