ट्रॅकवर पेटते गॅस सिलिंडर पाहून लोकलचे ब्रेक दाबले, मोठा अनर्थ टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपनगरीय रेल्वे मार्गावर पेटलेला गॅस सिलिंडर पाहून  मोटरमनने वेगात चाललेल्या लोकलचे वेळीच ब्रेक दाबत समोरून येणाऱ्या लोकललाही संदेश दिल्याने मध्य रेल्वेवर माटुंगा येथे सोमवारी दुपारी मोठा अपघात टळला. त्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचल्याचे बोलले जात आहे. रेल्वेवर सुरक्षेचे नियम न पाळता होत असलेल्या कामांमुळे प्रवाशांच्या जिवाला कशा प्रकारे धोका निर्माण झाला आहे हे उघडकीस आले आहे.

सीएसएमटीहून दुपारी 12.36 वाजता अंबरनाथ धिमी लोकल सुटली. या लोकलवर मोटरमन महेश परमार डय़ुटी बजावत होते. लोकलने दुपारी 12.57 वाजता माटुंगा स्थानक सोडल्यानंतर अप जलद व डाऊन जलद मार्गिकेच्या मध्य भागांत रुळांचे काही दुरुस्ती काम सुरू होते. यासाठी गॅस सिलिंडरचाही वापर केला जात होता. त्याच वेळी सिलिंडरने पेट घेतल्याने  कर्मचाऱ्यांनी या लोकलला इशारा केला. हा गोंधळ मोटरमन परमार यांनी पाहून लोकलचे आपत्कालीन ब्रेक दाबत लोकल जागीच थांबवली. त्याच वेळी बाजूच्या ट्रॅकवरून समोरच्या दिशेने येणाऱ्या लोकललाही लोकलचे हेडलाईट पेटवून इशारा दिला तसेच गार्ड सचिन गोडे यांनाही त्याच वेळी कळवले. कामगारांनी हा पेटता सिलिंडर धोका पत्करत उचलून रुळांच्या पश्चिम दिशेला थोडय़ा दूरवर एका झाडीत फेकून दिला व काही वेळात सिलिंडरला लागलेली आग विझली. त्यामुळे मोठा अनर्थही टळला. मोटरमन महेश परमार आणि गार्ड सचिन गोडे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अपघात होता होता वाचला.