
उपनगरीय लोकलच्या गर्दीवरील उपाय म्हणून मुंबईतील खासगी व सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्यासाठी रेल्वेने आग्रह धरला आहे. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी एक बैठक झाली असून दुसरी बैठक लवकरच होणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून नॉन पिकअवरमधील लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. तसेच चर्चगेट आणि सीएसएमटीमध्ये येत्या सप्टेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर `क्यूआर’ कोड पाहूनच अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना प्रवेश देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईच्या लोकलमध्ये दररोज 75 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामुळे गाड्यांना पिकअवरमध्ये प्रचंड गर्दी होत असते. सध्या कोविडमुळे अत्यावश्यक घटकांसाठी मर्यादित सेवा सुरू असल्या तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लोकल सुरू करताना `सोशल डिस्टिंन्सग’ राखण्याचे आव्हान रेल्वेपुढे आ वासून उभे आहे. त्यामुळे पिकअवरमधील गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतील सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव रेल्वेने मागे मांडला होता. त्यावर अभ्यास करण्यासाठी `इरकॉन’या संस्थेची नेमणूकही करण्यात आली होती. पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक जीव्हीएल सत्यकुमार यांनी बुधवारी यासंदर्भात वेबिनारद्वारे माहिती दिली. पालिका अधिकाऱ्यांशी कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत बैठकीत चर्चा झाली असून दुसरी बैठकही लवकरच होणार असल्याचे सत्यकुमार यांनी यावेळी स्पष्ट केले.
सीएसएमटी, चर्चगेट येथे मेट्रोप्रमाणे अॅक्सेस कंट्रोल
सप्टेंबरपासून सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकांत मेट्रोप्रमाणे अॅक्सेस कंट्रोल सिस्टम राबविण्यात येणार असून क्यूआर कोड पाहूनच अत्यावश्यक कर्मचाऱ्याना स्थानकांत प्रवेश देण्याचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येईल, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक जीव्हीएल सत्यकुमार यांनी सांगितले. सर्वसामान्यांसाठी लोकल चालू केल्या तर गर्दीचे नियोजन करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे अधिकाऱ्यांचे मत बनले आहे.
नॉन पिकअवरमध्ये लोकलच्या फेऱ्या वाढविणार
कार्यालयीन वेळा बदलण्याच्या प्रश्नावर जून महिन्यात राज्य सरकार, पालिका आयुक्त, मुंबईचे पोलीस आयुक्त, रेल्वेचे पोलीस आयुक्त आणि रेल्वे अधिकाऱ्यांची एक बैठक झाली असून या बैठकीत कार्यालयीन वेळा बदलण्यासंदर्भात पालिकेच्या वॉर्ड कार्यालयांना त्या-त्या विभागातील सरकारी आणि खासगी कार्यालयांची माहिती घेण्यास सांगितले आहे. तसेच कार्यालयीन वेळा बदलल्यानंतर दुपारी गर्दी वाढल्यास त्यासाठी नॉन पिकअवरमध्ये लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासंदर्भात रेल्वेचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाले.


























































