
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांची जीवघेणी गर्दी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या रखडलेल्या सवलतींचा प्रश्न आज संसदेत घुमला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय दिना पाटील यांनी लोकसभेत मुंबईकरांच्या व्यथा मांडत रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. “मुंबई आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, लोकलच्या फेऱ्या वाढवणे आता अनिवार्य झाले आहे,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
खासदार संजय दिना पाटील सभागृहात बोलताना म्हणाले की, मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी मर्यादेबाहेर गेली आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी रेल्वेने तातडीने लोकल गाड्यांची संख्या वाढवावी आणि फेऱ्यांचे योग्य नियोजन करावे.
रेल्वेने कोरोना काळापासून ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात मिळणारी सवलत बंद केली आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचे सांगत, ही सवलत तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी पाटील यांनी केली. अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या हक्काच्या सवलतीची वाट पाहत असून, केंद्र सरकारने त्यांच्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहावे, असे त्यांनी सुचवले.
तीर्थक्षेत्रांसाठी ‘स्वस्त टुरिस्ट पॅकेज’
केवळ मुंबईतील प्रवासच नाही, तर भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून अयोध्या, वाराणसी आणि वैष्णोदेवी यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांसाठी रेल्वेने ‘स्वस्त दरातील विशेष टुरिस्ट पॅकेज’ सुरू करावीत, अशी सूचनाही त्यांनी केली.


























































