
राज्याच्या अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून 15 ऑक्टोबरपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत असल्याचे राज्याचे पर्यावरणमंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मंगळवारी सांगितले. मुंबईवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कमर्शिअल भागातील कार्यालये चोवीस तास सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचेही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी दिली माहिती
लोकल सेवेबरोबर आणखीन काही सुविधा सुरू करण्यावरही सरकारचा भर आहे. आम्ही अनेक गोष्टी वेळ घेऊन विचारपूर्वक सुरू करीत आहोत. कारण एकदा सुरू केलेल्या सेवा आम्हाला पुन्हा बंद करायच्या नाहीत.
मुंबईत सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. परिणामी इतर कर्मचाऱयांना बस किंवा खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो. त्यात ऑफिसला जाण्या-येण्याच्या प्रवासात या कर्मचाऱ्यांचे कित्येक तास खर्ची पडतात. त्यामुळे लोकल सेवा सर्वांसाठी पूर्ववत करण्याची मागणी या कर्मचाऱयांबरोबरच मुंबईकरांकडून काही दिवसांपासून होत आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लोकल सेवा सुरू करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
24×7 ऑफिसचा विचार
मुंबईतील कोरोनाची स्थिती व लोकसंख्येचे विचार करता कार्यालयीन वेळांमध्ये बदल करण्याचा सरकारचा विचार आहे. मुंबईत विविध प्रकारची कार्यालये आहेत. त्यांच्या कामाच्या वेळा बदलण्याचे काम अवघड आहे. तरीही आम्ही सध्या विविध कार्यालये, संपुले आणि काॅर्पोरेट कंन्यांशी कामांच्या वेळांमध्ये बदल करण्याविषयी चर्चा करीत आहोत.
कार्यालयीन कामाच्या वेळेसाठी 24 तासांचा वापर करता येईल का, याचीही चाचपणी सुरू आहे. यावर काही तरी नक्कीच पर्याय समोर येईल. त्यामुळे लोकल सेवेवर ताण येणार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होऊ शकते असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
लोकल फेऱ्यांची संख्या
सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे लोकलच्या फेऱयांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाशी संवाद सुरू आहे. लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढवल्यावर अधिक जणांना प्रवासाची परवानगी दिली जाईल. अन्यथा प्रवासाच्या इतर साधनांवरील ताण अधिक वाढेल, असे ते म्हणाले.























































