ईव्हीएमचा गोंधळ, मतदार याद्यांमध्ये घोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

मुंबईत सगळीकडे अतिशय शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मतदान झाले. कांदिवली, बोरिवली, कुलाबा, परळ, मुलुंड, घाटकोपर, जोगेश्वरी, गोरेगाव या ठिकाणी मतदारांनी प्रचंड गर्दी केली. दरम्यान, भांडुप, मुलुंड, मालाड, कुर्ला या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली. परिणामी मतदारांची प्रचंड गर्दी झाली. आधीच उन्हाच्या काहिलीने घामाच्या प्रचंड धारांनी हैराण झालेल्या मतदारांचे त्यामुळे प्रचंड हाल झाले.

मालाड जनकल्याण नगर येथील सेंट ज्युड हायस्कूल येथील बुथ क्रमांक 280मधील ईव्हीएम मशीन सकाळी तांत्रिक कारणामुळे बंद पडले. त्यामुळे या बुथवरील मतदान तासभर उशिराने सुरू झाले. तर रियान इंटरनॅशनल हायस्कूल येथील बुथ क्रमांक 98, 101 आणि 104 येथेही तांत्रिक कारणांमुळे काही काळ ईव्हीएम मशीन बंद होते. परिणामी मतदारांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. कांदिवलीतील महावीर नगर येथील कपोई स्कूलबाहेर मतदारांनी प्रचंड गर्दी केली होती.

कुर्ल्यात 10 ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या. तांत्रिक दुरुस्ती झाल्यानंतर या मशीन पुन्हा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे मतदारांची रांग पुढे सरकण्यासाठी वेळ लागत होता. भांडुप पूर्वेकडील यशवंत चाँदजी आणि अहिल्या हायस्कूलमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्या. यशवंत चाँदजी हायस्कूलमध्ये मतदान सुरू झाल्यानंतर काही सेकंदांतच ईव्हीएम मशीन बंद पडले. केवळ 19 जण मतदान करू शकले. त्यानंतर तासभर मशीन बंदच होते. त्यामुळे मतदान केंद्रावर प्रचंड गर्दी झाली. तर अहिल्या हायस्कूलमध्येही अर्धा ते पाऊण तास मशीन बंद होते. घाटकोपर पूर्वेकडे एका मतदानकेंद्रावर प्रचंड उन्हामुळे ज्येष्ठ नागरिकाला भोवळ आली आणि त्यांनी ईव्हीएम मशीनवरच उलटी केली. मात्र निवडणुक कर्मचाऱयांनी वेळीच साफ सफाई केली आणि मतदान प्रक्रिया सुरू झाली.

यादीत दाखवलेली नावे संबंधित बुथमध्ये नसल्यामुळे त्या नावांवरच काट मारण्यात आली होती. त्यांना दुसऱया मतदान केंद्रावर पाठवण्यात आले. तर तिकडेही नाव न मिळाल्याने अनेक मतदारांनी घरचा रस्ता धरल्याचे एक मतदार किरण मोरे यांनी सांगितले. मुलुंडच्या मराठी विद्यालय येथे अनेकांची नावे यादीत नव्हती. घाटकोपर, विक्रोळी, मानखुर्द या ठिकाणी मात्र मतदान सुरळीत पार पडले. चेंबूर पूर्व येथील सुभाषनगरमध्ये ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी मतदार करीत होते.

कलिना एज्युकेशन शाळा, बुथ क्रमांक 29, 39वर ईव्हीएम मशीन बंद पडली. त्यामुळे मतदान केंद्रातील गर्दी वाढली. प्रचंड उकाडय़ाने हैराण झालेले मतदार या गर्दीत आणखी घामाघूम झाले.परळमध्ये डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये चार तर आर.एम. भट हायस्कूलमधील दोन मतदान केंद्रांत सकाळपासूनच गर्दी होती. शिरोडकर हायस्कूलमध्ये चार मतदार केंद्रे असल्यामुळे मतदार संख्या मोठी होती. यात ज्येष्ठ आणि दिव्यांगही होते. त्यामुळे व्हिलचेअर, व्हिलचेअर टॅक्सी (व्हॅन) तर उन्हाचा कडाका पाहून 250 मि.लि.च्या पॅकबंद पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांचा तगडा बंदोबस्तही होता. निवडणूक आयोगाची माणसे हसतमुखाने प्रत्येकाला मदत आणि मार्गदर्शन करत होती.

आर.एम. भट शाळेतही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर प्राथमिक वैद्यकीय साहाय्यक, नोकरीपेशा दांपत्यांच्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान नोंदले गेले. सकाळच्या सुमारास वरळी, शिवडी, कुलाबा, मलबार हिल विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या. यात मराठी मतदारांसह जैन, गुजराती समाजातील मतदारांची संख्या मोठी होती. भायखळा मतदारसंघात मोठय़ा संख्येने मुस्लिम मतदार मतदानासाठी पोहचले होते. वरळी, करीरोड, भायखळा व अन्य काही ठिकाणी मतदारांच्या सोयीसाठी मोकळ्या मैदानात मांडव उभारून मतदान केंद्रे बनवली गेली होती. तिथे उकाडय़ाने हैराण झालेले मतदार रांगा सोडून मतदान केल्याशिवाय माघारी जाताना दिसले. दुपारी 1 वाजेपर्यंत 28.33 टक्के मतदान झाले.

दक्षिण मध्य मुंबईत अणुशक्तीनगरपासून चेंबूर, माहीम, धारावी, सायन कोळीवाडा व वडाळा मतदारसंघात सकाळी संथ गतीने मतदान सुरू होते. माहीम, चेंबूरमधील संवदेनशील मतदारसंघाच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त होता. नाक्यानाक्यावर तपासणी सुरू होती. दक्षिण मध्य मुंबईत सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंजत 17. 5 टक्के मतदान झाले होते.

konkan-fin

मतदान करून कोकणात..
दोन दिवसांपूर्वीच शाळांचे निकाल जाहीर होताच अनेकांनी गाव गाठला. शनिवार, रविवार आणि मतदानाचा सोमवार असे तीन दिवस मिळाल्याने अनेकांनी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मुंबईबाहेर जाणे पसंत केले. पण अनेक असेही होते ज्यांनी मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय गावी जायचे नाही असा ठाम निर्धार केला होता. या दांपत्यानेही सोमवारी सकाळी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडल्यानंतर दुपारी साडेतीनची दादर-मडगाव गाडी पकडून आपले गाव गाठले.

पाच दशके न चुकता मतदान करणाऱया आजीबाईचा हिरमोड

aaji-blue

यादीतून नाव गायब झाल्याने मतदानाचा हक्क बजावता आला नाही
प्रत्येक निवडणुकीत आवर्जून आपला मतदानाचा हक्क बजावणाऱया वांद्रे शासकीय वसाहतीतील रामवाबाई नारायणदास या 72 वर्षीय आजीबाईंचा सोमवारी हिरमोड झाला. नवी मुंबईला नातेवाईकांकडे गेलेल्या असतानाही आज मतदानाचा हक्क बजवायचाच म्हणून त्यांनी सकाळी आठ वाजताच उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील वांद्रे पूर्व एमआयजी क्लब येथील मतदान केंद्र गाठले होते, मात्र नावाची चिठ्ठी घेण्यासाठी गेल्या असता आपले नावच मतदार यादीत नसल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांना धक्काच बसला. गेली पाच दशके मी नियमित मतदान करत असतानाही माझे नाव कसे गायब झाले असा सवाल त्यांनी केला आहे.

मेंदूवर शस्त्रक्रिया होऊनही आजोबांचे मतदान

ambulance-final
मुंबईतील मतदानाचा आकडा 60 टक्क्यांवर जात नसताना मतदान न करणाऱयांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम 71 वर्षीय एन. के. नायर या आजोबांनी केले आहे. मुंबईतील रुग्णालयात मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्यानंतरही मतदानाची दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याने त्यांनी घाटकोपरच्या मॉडर्न हायस्कूल छेडानगर मतदान केंद्रावर पोहचून मतदानाचा हक्क बजावला.

वयाची 85 गाठल्याने वांद्रे येथील ग्रेसीस डिसुझा यांना धड चालताही येत नाही आणि बसताही येत नाही. त्यामुळे ते घरी नेहमी झोपूनच असतात. तरीही ते आज व्हीलचेअरवर नवजीवन विद्यामंदिर येथील मतदान केंद्रावर आले आणि मतदानाचा हक्क बजावला.

aaji-guj-f

रुग्णवाहिकेतून गाठले मतदान केंद्र

82 वर्षीय हिराबेन दोशी यांना चालताही येत नव्हते. त्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेमधून मतदान केंद्रापर्यंत आणावे लागले. राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी हिराबेन यांनी घराबाहेर पडून मतदान केले.

95 वर्षांच्या गंगूबाईंचा हट्ट पूर्ण; अखेरच्या क्षणी मतदानaaji-f

कुर्ला बैलबाजार येथे राहणाऱया 95 वर्षांच्या गंगूबाई भुमय्या बोडा यांनी मतदानाची वेळ संपत असतानाच अखेरच्या क्षणी मतदानाचा हक्क बजावला. वय झालेले असल्याने कोणाच्या आधाराशिवाय चालता येत नाही. त्यामुळे गंगूबाई सकाळपासूनच आपल्याला कोणी तरी मतदानासाठी घेऊन जाईल या प्रतीक्षेत होत्या, मात्र उगाच त्रास नको म्हणत घरच्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले होते. पण सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर मात्र त्यांनी आपल्याला मतदान करायचेच आहे असा हट्ट धरला. त्यामुळे अखेर नाइलाजास्तव घरच्यांनी तिला मतदान केंद्रावर आणल्यानंतर पाच वाजून 55 मिनिटांनी त्यांनी मतदान करून आपला हट्ट पूर्ण केला.

aathvle-f

 

 

महायुती मुंबईतील सर्व जागा जिंकणार
मुंबईसह राज्यात महायुतीची हवा आहे. मतदारराजाही महायुतीच्याच बाजूने आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व सहा जागा महायुतीला मिळतील असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. ते वांद्रे पूर्व येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्यांनतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातही 40 हून अधिक जागा महायुती जिंकणार आहे. देशात सक्षम सरकार आणण्यासाठीच मतदार मोठय़ा उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सबका साथ, सबका विकास या मार्गानेच यापुढेही केंद्रातील सरकार चालेल असेही ते म्हणाले.

‘सखी’च्या स्वागताने महिला मतदार भारावल्या

sakhi-f
महिला मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी निकडणूक आयोगाने तयार केलेली सखी मतदान केंद्रे महिला मतदारांचे लक्षवेधक ठरली. मतदारांचे स्वागत करण्यासाठी मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापासून रांगोळी, फुले, गुलाबी क पांढऱया रंगाचे फुगे लावण्यात आले होते. अनेक ठिकाणी येणाऱया महिला मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत होते. या अनोख्या स्वागतामुळे महिला मतदार भारावून गेल्या.

मुंबईतील सहा लोकसभा मतदार केंद्रांकर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. येथे अनेक बूथ तयार केले होते. परंतु सखी बूथ हा सर्वांचा लक्ष वेधून घेत होता. दक्षिण मुंबईत दहा आणि उपनगरात दोन सखी मतदार केंद्रे तयार केली होती. या बूथ बाहेर फुगे लाकले होते. जागोजागी रांगोळी काढण्यात आली होती. सेल्फी पॉइंट आणि लहान मुलांसाठी पाळणा ठेकण्यात आला होता. स्वागत कमानीसह मतदानाचा हक्क बजाविण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे या महाकिद्यालयात येणारा प्रत्येक मतदार सखी बूथच्या परिरसरात काही क्षण थांबून पुढे जात होता.

आधी लगीन लोकशाहीचे

navri-f

लग्नाचा मुहूर्त चुकला, पण त्याची तमा न बाळगता ‘आधी लगीन लोकशाहीचे’ म्हणत घाटकोपरमध्ये नवरा विशाल कदम आणि नवरी शलाका घोटाळकर यांनी साईनाथ नगर मनपा हायस्कूलमध्ये मतदान केले.

third-f

तृतीयपंथींचाही उत्साह
माहीम मच्छीमार कॉलनीतील मतदारसंघात तृतीयपंथीयांनीही उत्साहात मतदान केले. केवळ फोटो नाही तर मतदान केल्यावर चार तृतीयपंथीयांनाही सेल्फीही काढण्याचा मोह आवरला नाही.