लोअर परेलच्या डिलाईल पुलाची एक मार्गिका सुरू, वाहतूक होणार सुलभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील डिलाईल पुलाच्या पूर्व दिशेची एक मार्गिका रविवार 17 सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नारळ वाढवून तसेच गणेशमूर्ती आगमन मिरवणूक मार्गस्थ करून ही मार्गिका खुली करण्यात आली.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या ‘जी/दक्षिण’ विभागात लोअर परळ रेल्‍वे स्‍थानकाजवळ, ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावर डिलाईल रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलावर ना. म. जोशी मार्गावरुन येणारे 2 आणि गणपतराव कदम मार्गावरुन येणारा 1 असे तीन पोहोच रस्‍त्‍यांचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. पैकी, पश्चिम दिशेची मार्गिका याआधीच दिनांक 1 जून 2023 रोजी खुली करण्यात आली होती. असे असले तरी, ना. म. जोशी मार्गावरील लोअर परळ आणि करी रोड स्थानकांना जोडणारा पूर्व दिशेला स्थित मार्ग हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या मार्गावरील दोन्ही बाजुपैकी किमान एक मार्गिका श्री गणेशोत्सवपूर्वी सुरू करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करत होते. त्या नियोजनात यश आले आहे. मुंबईकर नागरिकांची वाहतुकीची सोय व्हावी, या उद्देशाने डिलाईल पुलाची पूर्व बाजूस असलेली एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचा निर्णय सर्व संमतीने घेण्यात आला आहे. मुंबई जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह आमदार सुनील शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर तसेच महानगरपालिकेच्या पूल विभागाचे अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी या प्रकल्पाला वेगाने पूर्णत्वास नेण्याचे सातत्याने निर्देश दिले आहेत. तसेच आवश्यक तेथे रेल्वे प्रशासनासमवेत देखील समन्वय साधून या कामासाठी महानगरपालिकेने पाठपुरावा केला होता. प्रशासनाच्या नियोजनानुसार गणेशोत्सवापूर्वी पूर्वेकडील बाजुची एका मार्गिकेची वाहतूक सुरू झाली आहे.

मार्गिका खुली केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पालकमंत्री केसरकर म्हणाले की, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. 1 जून 2023 रोजी पश्चिम दिशेची मार्गिका उपलब्ध करून दिली होती तर आता पूर्व बाजूची एक मार्गिका खुली झाल्याने वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे. दुसर्‍या मार्गिकेचे काम पूर्ण होईपर्यंत या एकाच मार्गिकेवरून दोन्ही दिशेची वाहतूक सुरू राहणार आहे, असे केसरकर यांनी नमूद केले. स्थानिक गणेशोत्सव मंडळांनी या पुलावरून श्री गणेश मूर्ती आगमन मिरवणूक देखील नेली आहे. सर्व राजकीय पक्षांनी सामंजस्याने भूमिका घेऊन मुंबईतील नागरिकांना सदर पूल वापराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असेही केसरकर यावेळी म्हणाले.

आमदार सुनील शिंदे म्हणाले की, मागील काही दिवसांपासून हा पूल खुला व्हावा म्हणून पाठपुरावा करण्यात येत होता. आज सुरू झालेल्या मार्गिकेमुळे लोअर परळ, करी रोड या भागातील नागरिकांसोबतच दक्षिण मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांची सुविधा होईल. विशेषतः श्री गणेश उत्सवामध्ये भाविकांची आणि वाहनांची वाढती संख्या पाहता ही मार्गिका खुली होणे महत्त्वाचे होते. पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका प्रशासन तसेच स्थानिक पोलीस आणि नागरिक यांच्या समन्वयातून व सामंजस्यातून ही मार्गिका खुली झाली, प्रयत्नांना यश आले, असे आमदार शिंदे यांनी नमूद केले.

उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यात पावसाची उघडीप मिळाल्याने या पुलाचे काम वेगाने करणे शक्य झाले आहे. रेल्वे परिसराला जोडून असणारे ना. म. जोशी मार्गावर अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेचे गर्डर उभारण्याचे काम ऑगस्ट महिन्यात पूर्ण करण्यात आले. त्यापाठोपाठच मास्टिक, रॅम्प, कॉंक्रिटीकरण, रंगकाम, पथदिव्याची कामे केली. शेवटच्या टप्प्यातील डांबरीकरणाचे कामही पूर्ण करून ही पहिली मार्गिका सुरू झाली आहे, असे महाले यांनी नमूद केले.

प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडण्यपुरे यांनी सांगितले की, पूर्व दिशेला 90 मीटर रेल्वेचा भाग आहे. तर 225 मीटरचा भाग मुख्य भाग आणि खाली जमिनीशी जोडणारा कॉंक्रिटचा भाग आहे. पैकी कॉंक्रिटचे आणि डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासोबतच संरक्षण कठडे, पथदिवे आणि रंगकाम यासारखीही कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या मार्गिकेचे काम देखील वेगाने पूर्णत्वाकडे नेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.