
मुंबई महापालिकेने रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक कार पार्किंग सुरू केली. महालक्ष्मी मंदिराजवळच्या हबटाऊन स्कायबे या 21 मजली इमारतीत मुंबईकरांना 2 मिनिटांत गाडी पार्पिंग करता येणार आहे. पालिकेचे 240 वाहन क्षमता असलेले हे पहिले स्वयंचलित सार्वजनिक वाहनतळ आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी याचे लोकार्पण केले.
मुंबईत पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिका 24 प्रभागांमध्ये सार्वजनिक वाहनतळ निर्मिती आणि त्याचे व्यवस्थापन करणार असून त्यासाठी पार्किंग प्राधिकरणाची स्थापना केली आहे. कार पार्किंग झटपट व्हावे, वाहनचालकाचा वेळ वाचावा यासाठी महापालिकेने रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, सी आणि डी विभागांच्या प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल, अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड आणि मान्यवर उपस्थित होते.
- दर तासाला 60 वाहने वर-खाली आणली जाऊ शकतात.
- आठवडय़ाचे सातही दिवस 24 तास कार्यरत राहणार आहे.
- वाहनतळामध्ये स्वयंचलित पद्धतीने वाहनांची ने-आण करण्याकरिता दोन मोठे उद्वाहक असून या व्यतिरिक्त दोन शटल डिव्हाईस व दोन सिलोमेट डॉली आहेत तसेच कार वळवण्यासाठी 4 स्वयंचलित टर्न टेबलदेखील आहेत.
गाडी अशी पार्क होणार
कारची नोंद पार्किंगच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱया रिसेप्शन काऊंटरवर कॉम्प्युटरवर केली जाते. वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर असणाऱया एका भव्य पोलादी ‘प्लेट’वर कार उभी केली जाते. त्यानंतर ज्या पोलादी प्लेटवर कार उभी असते ती प्लेट स्वयंचलित पद्धतीने कारसह वाहनतळामध्ये प्रवेश करते. यानंतर 21 मजली वाहनतळामध्ये असणाऱया भव्य लिफ्टमध्ये ती कार स्वयंचलित पद्धतीने सरकवली जाते. ज्यानंतर 21 मजल्यांपैकी ज्या मजल्यावर कार उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहे त्या मजल्यावरील पाकि&ंगच्या ठिकाणी लिफ्ट स्वयंचलित पद्धतीनेच जाऊन ‘कार’ पार्क करते. याच पद्धतीने पार्किंगमधून कार बाहेर काढतानादेखील रोबोटिक व स्वयंचलित पद्धतीनेच ‘कार’ बाहेर पडते.
































































