मराठय़ांच्या ‘महाराष्ट्र क्रांती सेने’चा महायुतीला पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱया ‘महाराष्ट्र क्रांती सेने’ने शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीला आपला पाठिंबा रविवारी जाहीर केला. लोकसभा निवडणूक लढणार नसून राज्यभरातील 15 ठिकाणचे उमेदवार आपले अर्ज मागे घेतील, असे महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिवसेना नेते परिवहनमंत्री दिवाकर रावते, भाजप नेते शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. मराठा समाजाचे आरक्षण व अन्य मागण्यांसाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी कायम उभी राहिली. आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले असले तरी त्याला कोर्टाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे एसटीमध्ये आरक्षणानुसार मराठा समाजाच्या तरुणांना नोकरी मिळाल्यानंतर आरक्षणाचा निर्णय काहीही लागला तरी नोकरी काढून घेतली जाणार नाही. निर्णय विरोधात लागल्यास त्यांना कंत्राटी पद्धतीने सामावून घेतले जाईल, असे आश्वासन दिवाकर रावते यांनी दिले तर कोर्टाच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले असून सरकारची बांधिलकी या समाजाशी असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.