यंदाची संक्रांत सोहळा क्वीन कोण? उद्या रंगणार स्पर्धेची महाअंतिम फेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग एक महिना सुरू असलेली संक्रांत सोहळा स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रविवार, 21 फेब्रुवारीला या स्पर्धेची महाअंतिम फेरी रंगणार आहे. सायंकाळी 6 वाजता मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवर ही स्पर्धा होणार असून यंदाची ‘संक्रांत क्वीन’ कोण यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

मिती क्रिएशन्स आणि क्रॅव्हॉन हलदी तुलसी ड्रॉप्सतर्फे महिलांसाठी डिजिटल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मकरसंक्रांत म्हटली की डोळ्यासमोर येते ती सुंदर काळी साडी. म्हणूनच संक्रांत सोहळ्याच्या पहिल्या फेरीसाठी महिलांकडून काळ्या साडीतले फोटो घेतले गेले आणि देशविदेशातून 1000 हून अधिक महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. एक एक फेरी जिंकत या सर्व स्पर्धकांपैकी काही महिला आता स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. स्पर्धा म्हणजे फक्त जिंकणं, हरणं किंवा चढाओढच नव्हे तर तो एक अनुभव असतो ज्यातून शिकण्यासारखं बरंच काही असतं. आपलं व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी अशा स्पर्धा नक्कीच उपयोगी ठरतात. महिलांनी या संधीचा खूप छान उपयोग करून घेतला, असे या स्पर्धेच्या आयोजिका उत्तरा मोने यांनी सांगितले.

गाणी, गप्पा आणि ‘स्टार प्रवाह’वरील आपल्या लाडक्या कलाकारांच्या साथीने रंगणाऱया स्पर्धेच्या महा अंतिम सोहळ्यात सर्व विजेत्यांची घोषणा केली जाईल तसेच या वर्षीची संक्रांत सोहळा क्वीन जाहीर होईल. महाअंतिम सोहळ्यात पुष्कर श्रोत्री, सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे, मधुराणी गोखले-प्रभुलकर, हर्षदा खानविलकर हे कलाकारदेखील सहभागी होणार आहेत. तर प्र्रसिद्ध गायक नचिकेत देसाई यांच्या सुमधुर गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनीत देव करणार आहे. या संपूर्ण स्पर्धेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम प्रायोजक म्हणून ‘सामना’ वृत्तपत्राचीदेखील जोड स्पर्धेला मिळाली आहे.

भरघोस बक्षिसे

स्पर्धेच्या विजेत्यांना आणि सहभागी महिलांना अनेक आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. ईशा टूर्सतर्फे विजेतीला मिळणार लडाखची मोफत टूर तर इतर स्पर्धकांना काही गिफ्ट व्हाऊचर्स आणि Travel bags, क्रॅव्हॉनतर्फे आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स, ठाण्याच्या नगरसेविका नंदिनी विचारे यांच्याकडून विजेतीला मिळेल मानाची पैठणी तर इतर स्पर्धकांना सुंदर साडय़ा मिळतील. ‘कालनिर्णय’तर्फेदेखील भेटवस्तू मिळतील. त्याचबरोबर अशोक खामकर मसाले यांच्याकडूनदेखील स्पर्धकांना आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स मिळणार आहेत. वनश्री पांडे यांच्या नयापन क्रिएशनतर्फे ही काही विजेत्यांना खास ज्वेलरी गिफ्ट मिळणार आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी मिती ग्रुप या फेसबुक पेजला लाइक करा.