मुंबईकरांना मलेरियाचा ‘ताप’, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या वाढली

मुंबई शहरासह उपनगरात मुसळधार पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. अधूनमधून एखादी मोठी सर येऊन जात आहे. वातावरण ढगाळ आहे; परंतु या वातावरणात मुंबईकरांच्या डोक्याला ताप झाला आहे. कारण, मलेरियाच्या रुग्णांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रचंड वाढली आहे. याबाबत मुंबई महापालिकेने आकडेवारी जारी केली असून विविध ठिकाणांचे सर्वेक्षण करताना अनेक भागात डेंग्यू आणि मलेरियाच्या अळय़ा मोठय़ा प्रमाणावर आढळून आल्या.

मुंबई महापालिकेने वारंवार परिसर स्वच्छ ठेवा, ड्रम तसेच अडगळीच्या सामानांसह घरातील आणि परिसरातील कुंडय़ांमध्ये पाणी साचू देऊ नका, पाणी वारंवार बदला, असे आवाहन केले आहे. तरीही अनेक भागात डेंग्यू आणि मलेरियाच्या अळय़ांची पैदास मोठय़ा प्रमाणावर झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

आजार अंगावर काढू नका

दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे पाणी उकळून प्या. जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून जाणे टाळा. थंडी, ताप, अंगदुखी, सांधेदुखी, सर्दी-खोकला अशी लक्षणे असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, आजार अंगावर काढू नका, असे आवाहन असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी केले आहे.

जानेवारी ते 14 जुलै 2024 2025

मलेरिया 2852 3,490

डेंग्यू 966 734

चिकुनगुनिया 46 179

लेप्टोस्पायरोसिस 281 136

गॅस्ट्रो 5,439 4,831

हिपॅटायटीस ए, ई 493 477

कोविड 19 1646 1049

रुग्णांमध्येही वाढ

मुंबईत जलवाहिन्या अनेक ठिकाणी गळक्या असून पाणीचोरी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. या पार्श्वभूमीवर दूषित पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस आणि गॅस्ट्रो, चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येमध्ये वाढ

साथीच्या आजारांचा विळखा अजूनही मुंबईला कायम असल्याचेच दिसून आले. जानेवारी ते जुलै 2024 या कालावधीत मलेरियाच्या रुग्णांची संख्या 2 हजार 852 होती.

यंदा याच कालावधीत ही संख्या 3 हजार 490 इतकी आहे. यंदा 3 हजार 393 ठिकाणी मलेरियाच्या, तर तब्बल 14,233 ठिकाणी डेंग्यूच्या म्हणजेच एडीस इजिप्ती डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आढळली.