मुंबईत एका व्यक्तीने ई कॉमर्स वेबसाईटवरून 55 हजार रुपयांचा मोबाईल ऑर्डर केला. पण त्यांना डिलिव्हरीमध्ये चहाचे कप मिळाले आहेत. ग्राहकाने या विरुद्ध ई कॉमर्स कंपनीकडे तक्रार केली पण कंपनीने दाद दिली नसल्याचे त्यांनी म्हटले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, माहिममध्ये राहणारे अमर चव्हाण हे बेस्टमध्ये इंजिनीअर म्हणून काम करतात. अॅमेझॉनवरून त्यांनी 54 हजार 999 रुपयांचा Techno Fantom V Fold मोबाईल ऑर्डर केला. या मोबाईलचे पार्सल डिलिव्हरी बॉय घेऊन आला. चव्हाण यांनी अनबॉक्सिंग करताना याचा व्हिडीओही काढला. पण चव्हाण यांनी मोबाईलचा बॉक्स उघडला तेव्हा यात मोबाईल नव्हता. तर याच चहाच्या कपाचा सेट होता.
चव्हाण यांनी आधी अॅमेझॉनमध्ये तक्रार केली, तेव्हा कंपनीने यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पण कंपनीने काहीच कारवाई केली नसल्याचे चव्हाण यांनी म्हटले. शेवटी चव्हाण यांनी पोलिसांत धाव घेतली. मोबाईलची सगंळी बिलं त्यांनी पोलिसांना दाखवली इतकेच नाही तर ज्या डिलिव्हरी बॉयने हा फोन डिलिव्हर केला त्याचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना दिले. पोलिसांनी चव्हाण यांची तक्रार दाखल केली असून पुढे तपास सुरू आहे.