
गिरगावच्या शेफ पंकज नेरुरकर याचे दादर, प्रभादेवी येथील ‘खडपे’ज रेस्टॉरंट लॉकडाऊनचा फटका बसून बंद झाले. पण पंकज यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या नॅनो कारला चालतंबोलतं हॉटेल बनवलं. पत्नीच्या मदतीने घरी मालवणी मांसाहारी जेवण बनवून नॅनोमधून विकायला सुरुवात केली. त्याची ही शक्कल कमालीची यशस्वी झाली असून दिवसाला चार हजार रुपयांपर्यंतची कमाई होत आहे.
पंकज नेरुरकर यांनी 20 वर्षे हॉटेलात नोकरी केली आहे. त्यांना खूप चांगले पदार्थ बनवता येतात. त्याच्या ‘खडपे’ज या हॉटेलातील फिश थाळी खूप प्रसिद्ध होती. खास मालवणी पद्धतीचे मांसाहार करण्यासाठी ग्राहक तिथे येत. कोरोनामुळे रेस्टॉरंट सुरुवातीला बंद होते. नंतर जेव्हा सुरू झाले तेव्हा जास्त ग्राहक येत नव्हते. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ लागले. त्यामुळे नाइलाजाने पंकजला रेस्टारंट बंद करावे लागले. ऑक्टोबरपासून त्यांनी घराबाहेर उभ्या असलेल्या नॅनोमधून पदार्थ विकायला सुरुवात केली. आंबेवाडीच्या नाक्यावर त्यांची नॅनो कार उभी केलेली असते. दरदिवशी साधारण 15 पदार्थ तयार करतात.
नॅनो फूड केले खरे, पण सुरुवातीला एक-दोन ग्राहकही येत नव्हते. मी निराश झालो. मात्र तरी काम थांबवलं नाही. हळूहळू दोन-चार ग्राहक येऊ लागले. त्यांना जेवण आवडल्यावर ते आपल्यासोबत इतरांना घेऊन येऊ लागले, पंकज सांगतात. रेस्टॉरंटमध्ये जे पदार्थ 300 रुपयांना विकत होतो, तेच नॅनो कारमध्ये 100 रुपयांना देतो. ग्राहक वाढले की माझा नफा वाढेल. रोजच्या ग्राहकांसाठी आम्ही व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यात मेन्यू अपडेट करतो, पंकज यांनी सांगितले.
स्वस्तात मस्त
अवघ्या काही दिवसांत पंकज नेरुरकर यांच्या नॅनो फूडने जम बसवलाय. महिन्याला लाख रुपयांची कमाई होत आहे. त्यांना पत्नी दीप्ती हिची साथ तर आहेच. तीन मदतनीसदेखील आहेत. हे मदतनीस त्यांच्या बंद झालेल्या खडपे हॉटेलमध्य आधी कामाला होते. नॅनो फूडचे मॉडेल आणखी पुढे न्यायचा त्यांचा विचार आहे. स्वस्त दरात मस्त जेवण देण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. जे लोक पंचतारांकित हॉटेलात जाऊ शकत नाहीत, त्यांना त्याच चवीचं जेवण नॅनो फूडमध्ये द्यायचं आहे. नॅनो फूडची सर्विस दुपारी 12 ते 3 आणि सायंकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असते.





























































