
मंत्रालयातील वाढत्या गर्दीमुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडत आहे. दुसरीकडे गर्दीच्या रेटय़ामुळे अधिकाऱयांना काम करणे मुश्कील झालेले असताना आजच्या अनियंत्रित गर्दीमुळे मंत्रालयातल्या कुलरमधील पिण्याचे पाणी संपले. त्यामुळे संध्याकाळनंतर मंत्रालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱयांचे घसे कोरडे पडले होते.
मंत्रालयात दररोज गर्दी वाढत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी तर अभूतपूर्व गर्दी होते. आजच्या कॅबिनेटच्या निमित्ताने विविध कामे घेऊन आलेल्यांची जत्रा उसळली होती. आजच्या दिवशी आठ हजारांहून अधिक व्हिजिटर्सची नोंद झाली. त्यापैकी सुमारे तीन हजार व्हिजिटर्सनी तर मुख्यमंत्री कार्यालयाला भेट दिली. या वाढत्या गर्दीमुळे मंत्रालयाच्या प्रशासकीय यंत्रणेवर कमालीचा ताण पडत आहे. वाढत्या गर्दीमुळे मंत्रालयाच्या पाणी पुरवठय़ावर परिणाम झाल्याची चर्चा होती. कारण संध्याकाळी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमधल्या बहुतांश कुलरमधील पिण्याचे पाणीच संपले होते. शेजारच्या अॅनेक्स इमारतीमधल्य कुलरमधील पाणी पिण्याची वेळ अनेक कर्मचाऱयांवर आली होती. रात्री उशिरापर्यंत काम करणारे कर्मचारी व पोलिसांना पिण्यासाठी पाणीच उपलब्ध नव्हते.






























































