मुंबई मराठी पत्रकार संघाचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर, कमलेश सुतार यांना राजकीय पत्रकारितेसाठी रमेश भोगटे पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
कमलेश सुतार

पत्रकार दिनाचे औचित्य साधत मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे 6 जानेवारी रोजी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यात यंदाचा उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांताबद्दल दिला जाणारा रमेश भोगटे पुरस्कार ‘मुंबई तक’चे संपादक कमलेश सुतार यांना जाहीर झाला आहे. तर कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील पत्रकारितेसाठी दिला जाणारा पुरस्कार कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार ‘महाराष्ट्र टाइम्स’चे हेमंत साटम यांना देण्यात येणार आहे.

स्ट्रटेजीक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष आणि लेखक संदीप वासलेकर यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता पत्रकार भवन येथे हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. यावेळी सायंकाळी 5 वाजता मराठी गीतांच्या वाद्यवृंदाचे आयोजनही करण्यात आले आहे. बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार ‘तरुण भारत संवाद’चे राम खांदारे यांना, पत्रकारितेला उपयुक्त ठरणाऱया विषयावर (उदा. सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदी) लेखन लिहिणाऱया पत्रकाराचे चालू सालातील उत्कृष्ट पुस्तक, जयहिंद प्रकाशन पुरस्कार ‘लोकमत’चे योगेश बिडवई, बेआसरा फाऊंडेशनचे कंटेंट एडिटर अजय कौटिकवार यांना विभागून देण्यात आला आहे.

विद्याधर गोखले ललित लेखन पुरस्कार ‘पुण्यनगरी’चे चंद्रशेखर कुलकर्णी, ‘शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे स्मृती पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट बातम्यांसाठी ‘लोकसत्ता’चे सुरेश वांदिले यांना जाहीर झाला आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी हे पुरस्कार जाहीर केले. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून लोकांनी मोठय़ा संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी केले आहे.