मंडयांचा पुनर्विकास, दुरुस्तीला वेग; सहा मार्केटच्या कामांना वेग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील मंडयांचा पुनर्विकास आणि दुरुस्तीला वेग आला असून नागरिकांना स्वच्छ, सुंदर मंडया देण्यासाठी पालिका वेगाने काम करीत आहे. मुंबईतील सहा महत्त्वाच्या मंडयांच्या कामांचा आढावा आज सभागृह नेत्या विशाखा राऊत, अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी करून घेतला.

मुंबईकरांना स्वच्छ-सुंदर, सुविधायुक्त मंडया उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून मार्केटचा पुनर्विकास वेगाने करण्यात येत आहे. यामधील वांद्रे परिसरातील पाली हिल मंडई, माहीमची गोपी टँक मंडई, दादर परिसरातील क्रांतीसिंह नाना पाटील मंडई व मीनाताई ठाकरे फूल मंडई, परळ परिसरातील डॉक्टर शिरोडकर मंडई आणि दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील महात्मा फुले मंडई अशा सहा मंडईंची पाहणी सभागृह नेत्या, अतिरिक्त आयुक्तांकडून करण्यात आली. या दौऱयाप्रसंगी नगरसेविका प्रीती पाटणकर, जी उत्तरचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, बाजार खात्याच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे, डॉ. शरद आराख, निशिकांत लुमण, सचिन घेवदे आदी उपस्थित होते.

असे सुरू आहे काम

पाली हिल मंडईच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण होत आले असून पुढील दहा दिवसात परवाना धारकांना नवीन इमारतीत स्थलांतरीत केले जाईल. क्रांतिसिंह नाना पाटील मंडईतील खतनिर्मिती प्रकल्पाची पाहणीही यावेळी करण्यात आली. दादर पश्चिमच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल मंडईच्या अत्याधुनिकरणासाठी ठिकाणाची पाहणी करण्यात आली. परळच्या शिरोडकर मंडईच्या मासळी मार्केटचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. फोर्टच्या महात्मा जोतिबा फुले मंडईचे कामही हेरिटेज सौंदर्याला कोणतीही बाधा न पोहोचवता केले जाणार आहे.