‘मातोश्री’वर आलेल्या शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांचा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँकेच्या कर्जवसुलीच्या तगाद्याची स्थानिक पातळीवर दखल न घेतल्यामुळे पनवेलमधील शेतकरी महेंद्र देशमुख यांनी रविवारी त्यांच्या लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी देशमुख यांना ताब्यात घेतले पण या शेतकऱ्याला सोडून देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

महेंद्र देशमुख म्हणाले की, बँकेने माझ्यावर आठ लाख रुपयांची तीन कर्ज दाखवली आहे. ही सर्व कर्ज खोटी आहेत. रायगड पोलिसांनी माझी तक्रार घेतली नाही. माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. पण तरीही माझी समस्या सुटत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली देशमुख यांनी दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारे प्रत्येक जण मुख्यमंत्र्यांना भेटायला आला तर अवघड होईल. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शेतकऱ्याला सोडून देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे काय काम आहे त्याची विचारपूसही करण्यास सांगितले आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

  • पनवेलमधील महेंद्र देशमुख हे त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीसह सकाळी मातोश्री निवासस्थानाच्या परिसरात आले. बँकेच्या कर्जाच्या संदर्भात त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट हवी होती. मात्र पोलिसांनी परवानगी नकारली. पण तरीही त्यांनी मातोश्रीकडे जाण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी देशमुख व त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले.
  • या प्रकाराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली. मातोश्रीवर आलेल्या शेतकऱ्याला सोडण्यास त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच त्याचे काय काम आहे याबाबत विचारपूस करण्यास मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सांगितले आहे.