माटुंग्याची आद्य ग्रामदेवता मरूबाई, उदे गं अंबे उदे!

राज चिंचणकर

मुंबई सात बेटांमध्ये विभागली गेली होती तेव्हा तुर्भे, माहीम व शिवडी या परिसरात एक टेकडी होती. ‘मरूबाई टेकडी गाव’ या नावाने ती ओळखली जात होती. सन 1888 मध्ये मुंबईचा विकास करताना ब्रिटिशांनी मरूबाई टेकडीचा भूभाग ताब्यात घेतला, तेव्हा 288 वार इतक्या क्षेत्रफळाचा भाग मरूबाई मंदिरासाठी मोकळा ठेवला. याच जागेवर मरूबाई गावदेवीच्या मूळ मूर्तीची स्थापना करण्यात आली.

माटुंग्याची आद्य ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरूबाई गावदेवीचे मंदिर माटुंगा पूर्वेकडील नाथालाल पारेख मार्गावर. मरूबाईच्या नावावरूनच या परिसराला ‘माटुंगा’ हे नाव प्राप्त झाले. गाभाऱयात सुवर्णालंकारांनी सजलेली आणि ललाटी मळवट भरलेली देवीची अतिशय तेजस्वी मूर्ती विराजमान आहे. त्रिशूळ, सर्प, गदा अशी अनेकविध आयुधे देवीने धारण केलेली आहेत. मरूबाईची मूळ शिळास्वरूपातील मूर्ती सध्याच्या मूर्तीमागेच आहे, असे सांगितले जाते; परंतु ही मूर्ती कुणालाही पाहण्यास मिळत नाही. 1992 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. मंदिरावर सोन्याचा कळस चढविण्यात आला आणि मरूबाईच्या पालखीलाही सोन्याचा मुलामा देण्यात आला. मरूबाई मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे अश्विन नवरात्रीतच नव्हे; तर वर्षभरातील सर्व पौर्णिमांना मंदिरात होमहवन केले जाते. चैत्र नवरात्रीतही धार्मिक कार्यक्रम होतात. चैत्र पौर्णिमेला होमहवन करून देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते.