
भांडूपच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात बालके दगावल्याच्या पार्श्वभूमीवर आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसूतिगृहाला भेट देऊन आरोग्य सुविधेचा आढावा घेतला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. ऑगस्ट 2021 पासून या ठिकाणी करण्यात आलेल्या उपचारांमुळे 234 बालकांना जीवनदान मिळाल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.
इतर ठिकाणी जन्मल्यानंतर प्रकृती गंभीर असलेली बालके या ठिकाणी एनआयसीयूमध्ये दाखल केली जातात. या ठिकाणी अद्ययावत उपचारही केले जातात. आज भेटलेल्या एका बाळाचे वजन 1.900 ग्रॅम होते. ते आता अडीच किलो झाले असून त्याची प्रकृती ठणठणीत असल्याची महितीही महापौरांनी दिली. या ठिकाणची एनआयसीयू सुविधा इंडियन पेडियाट्रिक नेटवर्क प्रा.लि.कडून चालवली जाते. या संस्थेमार्फत एका सत्रात दोन अर्हताप्राप्त डॉक्टर्स कार्यरत आहेत. हे डॉक्टर शिशु तज्ञ, बालरोग तज्ञ आहेत. या ठिकाणी ऑगस्टपासून 268 प्रकृती गंभीर असलेले नवजात शिशु दाखल करण्यात आले होते. यातील 234 बालकांना वाचवण्यात यश आल्याचेही महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.



























































