पेंग्विन आता मुंबईकर झाले आहेत, महापौरांनी भाजपला सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पेंग्विन 2017 साली दक्षिण कोरियातून आणण्यात आले आहेत. ते आता पूर्णपणे मुंबईकर झाले आहेत. अशा वेळी त्यांच्या नावाचा मुद्दा उपस्थित करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने करू नये. त्यांचा बालिशपणा आता वाढत चालला आहे, असे अशा शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला सुनावले.

भाजपच्या चित्रा वाघ यांनी पहिल्यांदा पेंग्विनला दिलेल्या इंग्रजी नावावरून तर आता थेट महापौरांवर वैयक्तिक टीका करत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पार्श्वभूमीवर नुसती उंची असून चालत नाही. विचारांचीही उंची असावी लागते, जी दुकानात मिळत नाही. भाजपने घाणरेड्या पद्धतीने राजकारण सुरू केले आहे. त्यावर आता बोलणं योग्य वाटत नाही. मुख्यमंत्र्यांचे काम घराघरांत पोहोचले आहे, हीच त्यांची पोटदुखी आहे, असेही महापौर म्हणाल्या.

गुजरातमधील पेंग्विन पार्कमधली नावे हिंदुस्थानी आहेत का?

गुजरातमध्येदेखील पेंग्विन पार्क तयार करण्यात आले आहे. गुजरातचे शिक्षणमंत्री जितूभाई वघाणी यांनी अहमदाबादमधील या पार्कचे उद्घाटन केले. गुजरातमधील या पेंग्विन पार्कसाठी 264 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या ठिकाणी एकूण 5 पेंग्विन आहेत. त्यांची नावे सिमोन, पुंबा, नेमो, मुशू आणि स्वेन अशी आहेत. गुजरातमध्ये त्यांना हिंदुस्थानी नावे ठेवता आली नाहीत का, असा सवाल महापौरांनी केला. दरम्यान, वॉर्ड पुरर्रचनाबाबत निवडणूक आयोग निर्णय देईल. तो जो असेल तो आम्ही मान्य करू. शिवसेना फायदा-तोटय़ाचा विचार करून काम करत नाही, असेही महापौरांनी स्पष्ट केले.