
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलून काढा या मागणीसाठी ‘मनसे’च्या वतीने रविवारी मुंबईत मोर्चा काढण्यात आला. हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा हा मोर्चा काढला गेला. या मोर्चासाठी ‘मनसे’चे कार्यकर्ते विविध भागांमधून मुंबईत आले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मोर्चात सहकुटुंब सहभागी झाले होते. तत्पूर्वी त्यांनी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मनसे कार्यकर्त्यांनीही मोर्चापूर्वी दादर येथील राम मंदिरात आरती केली. हिंदू जिमखाना येथून सुरू झालेल्या मोर्चाचे आझाद मैदानात सभेमध्ये रुपांतर झाले. राज ठाकरे यांनी सभेला मार्गदर्शन करताना पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकललेच पाहिजे असे सांगितले. जन्मापासून जे या देशात राहत आहेत त्यांना कुणीही बाहेर काढत नाही मग सीएए, एनआरसीविरुद्ध मोर्चे काढून मुस्लिमांनी कोणाला ताकद दाखवली, असा सवाल त्यांनी केला.
राज ठाकरे म्हणाले की, मराठी मुसलमान राहतात तिथे दंगली कधीच झालेल्या नाहीत. मीरा-भाईंदर, वसई, विरारमध्ये तर नायजेरियन लोकांनी उच्छाद मांडला आहे. ते ड्रग्ज विकतात, माता-भगिनींची छेड काढतात. त्यांचा बंदोबस्त व्हायलाच पाहिजे.
तलवारीला तलवारीने उत्तर देऊ!
आज आम्ही मोर्चाला मोर्चाने उत्तर दिले असून यापुढे उन्माद घातलात तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. कुणीही येते, कसेही राहते. देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.





























































