मुंबई मेट्रोच्या चौदा मार्गाचे नियंत्रण गोरेगावच्या मेट्रो भवनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत तब्बल चौदा मेट्रोचे मार्ग तयार होत आहेत त्यामुळे मुंबई शहरापासून मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अगदी थेट ठाण्यातील गायमुख, तळोजा, बदलापूरला एका तासात जाण्यासाठी तब्बल 337 किमीचे मेट्रो रेल्वेचे जाळे तयार होत आहे. विशेष म्हणजे गोरेगावमध्ये तयार होणाऱ्या 32 मजली मेट्रो भवनातून मेट्रो रेल्वेच्या या चौदा मार्गांचे नियंत्रण होणार आहे. सुमारे साडेबारा कोटी रुपये खर्च करून ही इमारत बांधण्यात येणार आहे.

मुंबईत मेट्रो रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात येत आहे. या संपूर्ण मेट्रो रेल्वेचे नियंत्रण गोरेगावमध्ये उभारण्यात येणाऱ्या भव्य अशा मेट्रो भवनातून करण्यात येणार आहे. या मेट्रो भवनाचे भूमीपूजन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मेट्रो मार्गामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण प्रचंड कमी होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाला पूरक अशी ही 32 मजली इमारत उभारण्यात येत आहे. वीज व पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होईल अशा प्रकारे या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. इमारतीचे बांधकामही पर्यावरणस्नेही वापरण्यात येणार आहे. अतिशय अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या इमारतीमधून मुंबई व महानगर प्रदेशातल्या मेट्रो रेल्वेचे नियंत्रण करण्यात येईल.

मेट्रो भवनातून नियंत्रित होणारे मेट्रो मार्ग

  • मेट्रो लाईन 1-वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर किमी-11. 4. खर्च 2 हजार 356 कोटी रु.
  • मेट्रो लाईन 2 अ- दहिसर-डीएन नगर- किमी-18.6 खर्च- 6 हजार 410 कोटी रु.
  • मेट्रो लाईन 2 ब- डी.एन. नगर-मंडाले- किमी23.6, खर्च 10 हजार 968 कोटी
  • मेट्रो लाईन 3- कुलाबा-सिप्झ, किमी 33.5, खर्च 23 हजार 136 कोट रु.
  • मेट्रो लाईन 4-वडाळा-कासारवडवली, किमी 32.3, खर्च 14 हजार 549 रु.
  • मेट्रो लाईन 4 अ- कासारवडवली-गायमुख किमी 2. 7, खर्च 949 कोटी रु.
  • मेट्रो लाईन 5- ठाणे-भिवंड-कल्याण, किमी 24. 9 खर्च 8 हजार 414 कोटी रु.
  • मेट्रो लाईन 6- समतानगर-विक्रोळी, किमी 14.5, खर्च 6 हजार 716 कोटी रु.
  • मेट्रो लाईन 7- दहिसर पूर्व- अंधेरी पूर्व किमी 16. 5, खर्च 6 हजार 208 कोटी रु.
  • मेट्रो लाईन 8- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ किमी 35, अंदाजित खर्च 15 हजार कोटी रु.
  • मेट्रो लाईन 9- दहिसर पू-मिरा भाईंदर- अंधेरी पूर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ, किमी 13.5, खर्च 6 हजार 607 कोटी रु.
  • मेट्रो लाईन 10- गायमुख-शिवाजी चौक(मीरा भाईंदर) किमी 9.2 किमी, खर्च 4 हजार 476 कोटी रु
  • मेट्रो लाईन 11- वडाळ-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, किमी 12.7 खर्च 8 हजार 739 कोटि रु.
  • मेट्रो लाईन 12- कल्याण- तळोजा, किमी 20.7 , खर्च 5 हजार 865 कोटी रु.
  • मेट्रो लाईन 13-शिवाजी चौक(मीरा भाईंदर)-विरार किमी 23, खर्च 6 हजार 900 कोटी रु.
  • मेट्रो लाईन 14 -कांजुरमार्ग-बदलापूर, किमी 45 खर्च 13 हजार 500 कोटी रु.