
भुयारी मेट्रोचा (मेट्रो-3) वरळी सायन्स म्युझिअम ते कफ परेडचा अंतिम टप्पा लवकरच प्रवाशी सेवेत दाखल करण्याची तयारी सुरू आहे. यादरम्यान मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाचा नवीन फलक झळकवला आहे. शिवसेनेने आंदोलनाचा दणका दिल्यानंतर मेट्रो प्रशासनाने स्थानकाच्या नावात बदल केला आणि नामफलकामध्ये शिवरायांच्या नावाचा ठळक उल्लेख करीत जाहिरात कंपनीचे नाव मागे लोटले आहे.
मेट्रोच्या स्थानकांच्या नावात जाहिरात कंपन्यांना स्थान देऊन कोटय़वधीचा महसूल कमावण्याचे उद्दिष्ट मेट्रो प्रशासनाने ठेवले. यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नावात ‘कोटक’ बँकेचे नाव घुसवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या आधी जाहिरातदाराच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यासंदर्भात दै. ‘सामना’ने वृत्त प्रसिद्ध केले आणि शिवसेनेने मेट्रो स्थानकाबाहेर आंदोलन केले होते.