मेट्रोच्या कामातील उच्च दाब वीजवाहिनीचा अडथळा दूर होणार, टाटा पॉवर उभारणार टॉवर

मुंबई मेट्रोच्या अमर महाल घाटकोपर-विक्रोळी दरम्यानच्या कामात असलेला उच्चदाब वीज वाहिनीचा अडथळा दूर होणार आहे. मुंबईला वीज पुरवठा करणाऱया उच्चदाब वीज वाहिन्यामुळे मेट्रोच्या कामाचा वेग मंदावणार आहे. त्याची दखल घेत टाटा पॉवरने अमर महाल घाटकोपर- विक्रोळी दरम्यान तब्बल 50 मीटर उंचीचा थ्री सर्किट हायटेन्शन ट्रान्समिशन टॉवर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील मेट्रोचे काम वेगात पूर्ण करता येणार आहे.

घाटकोपर- विक्रोळी दरम्यान टाटा पॉवरच्या मुंबईला वीज पुरवठा करणाऱया 20 केव्हीच्या उच्चदाब वीज वाहिन्या आहेत. याच वाहिन्यांच्या खाली मेट्रोचे काम सुरू आहे. या वाहिन्यांमुळे मेट्रोचे काम वेगात करण्यावर मर्यादा येऊ नयेत म्हणून टाटा पॉवरच्या प्रोजेक्ट टीमने येथे 3-सर्किट हायटेन्शन ट्रान्समिशन टॉवर उभारण्याबाबत डिझाईन तयार केले आहे. सदरचा टॉवर तब्बल 1 कोटी रुपये खर्च करून टाटा पॉवर डिसेंबरअखेर उभारणार आहे. दरम्यान सदरचा टॉवर उभारताना मुंबईचा वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवला जाणार असल्याचे टाटा पॉवरने स्पष्ट केले आहे. सध्याच्या परिस्थितीत येथील उच्चदाब वीज वाहिन्या आणि मेट्रोचे काम पाहता भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याशिवाय पर्याय नव्हता, मात्र टाटा पॉवरने त्यावर थ्री सर्किट हायटेन्शन टॉवरचा पर्याय शोधला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या