
पश्चिम उपनगरातील वाहतूक काेंडीपासून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. मुंबई मेट्रोच्या रेड लाइन 7 आणि येलो लाइन 2 ए या दोन मार्गिका डिसेंबरपूर्वी प्रवासी सेवेसाठी खुल्या केल्या जाणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या प्रकल्पाचे काम फास्ट ट्रकवर घेतले असून सध्या येथे मेट्रो फेऱयांची चाचणी सुरू आहे. या मेट्रो मार्गिकांमुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी गतिमान होणार आहे.
एमएमआरडीए आयुक्त डीव्हीआर श्रीनिवास यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना मेट्रो मार्गिकांबाबत ही खूशखबर दिली आहे. मुंबई मेट्रोच्या अंधेरी-पूर्व ते दहिसर (रेड लाइन 7) आणि डीएनए नगर ते दहिसर (येलो लाइन 2ए) या प्रकल्पांचे काम लवकरच पूर्ण होऊन पुढील तीन ते चार महिन्यांत म्हणजेच डिसेंबरपर्यंत या मार्गिका मुंबईकरांच्या प्रवासीसेवेत दाखल होतील अशी मला आशा आहे. या मार्गिका डिसेंबर 2019 पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट होते, परंतु विविध कारणांमुळे प्रकल्पाच्या कामाला उशीर झाला. रेड लाइन 7 आणि येलो लाइन 2 ए या मार्गिकांबरोबरच उर्वरित दोन मार्गिकाही पुढच्या वर्षी जूनपर्यंत खुल्या होतील, असेही श्रीनिवास यांनी सांगितले. त्यांनी अलीकडेच मेट्रो प्रकल्पाची पाहणी करून अधिकाऱयांकडून कामाचा आढावा घेतला होता.
वाहतूककाेंडीची डोकेदुखी दूर होणार
पश्चिम उपनगरातील द्रुतगती महामार्ग तसेच इतर प्रमुख मार्गांवर सकाळी आणि सायंकाळी ‘पीक अवर्स’ला मोठी वाहतूककाेंडी होते. मेट्रोच्या विस्तारित नेटवर्कमुळे लवकरच या काेंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे. एमएमआरडीएने त्याच दिशेने मेट्रो प्रकल्पाच्या कामांना गती दिली आहे.
असे असेल मेट्रो नेटवर्क
लाइन 7 – दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व (उन्नत)
- अंतर – 16.495 किमी
- डेपो – दहिसर (प्रस्तावित) आणि मालवणी (तात्पुरती व्यवस्था)
- स्थानकांची नावे (एकूण 14) – दहिसर पूर्व, ओवरीपाडा, नॅशनल पार्क, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, पुष्पा पार्क, दिंडोशी, आरे, गोरेगाव पूर्व (महानंद), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर), शंकरवाडी, गुंदवली.
लाइन 2 ए – दहिसर पूर्व ते डी. एन. नगर-अंधेरी (उन्नत)
- अंतर – 18.589 किमी.
- डेपो – मालवणी
स्थानकांची नावे (एकूण 17) – दहिसर पूर्व, अप्पर दहिसर स्थानक (आनंद नगर), कांदरपाडा (ऋषी संकुल), मंडपेश्वर (आयसी कॉलनी), एक्सर, बोरिवली पश्चिम (डॉन बॉस्को), पहाडी एक्सर (शिंपोली), कांदिवली पश्चिम (महावीर नगर), डहाणूकरवाडी (कामराज नगर), वालनई (चारकोप), मालाड पश्चिम, लोअर मालाड (कस्तुरी पार्क), पहाडी गोरेगाव (बांगुरनगर), गोरेगाव पश्चिम, ओशिवरा (आदर्श नगर), लोअर ओशिवरा (शास्त्राr नगर) आणि अंधेरी पूर्व (डी. एन. नगर).






























































