
गेली कित्येक वर्षे गिरणी कामगार हक्काच्या घरात जाण्याचे स्वप्न बघत आहेत. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. गिरणी कामगारांच्या मुलांना नोकरी देण्याचे आश्वासनही हवेत विरले आहे. याविरोधात गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गिरणी कामगारांच्या वारसांनी एकत्र येऊन गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटना स्थापन केली आहे. येत्या दहा दिवसांत गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी काढली नाही तर राज्यभरातील लाखो गिरणी कामगार व वारसदार एकत्र येऊन म्हाडा ऑफिससमोर आंदोलन करतील, असा इशारा या संघटनेचे अध्यक्ष संतोष हुमरळेकर तसेच तेजस कुंभार, अमित घरत, प्रवीण माने, सुजित कोळेकर, विठ्ठल चव्हाण यांनी दिला आहे.
अशी आहे संघटनेची मागणी
म्हाडाने 28 जून 2012 रोजी पहिल्या टप्प्यात 6,925 कामगारांना घरे दिली. दुसऱया टप्प्यात 9 मे 2016 रोजी सहा गिरण्यांच्या जागेवरील 2 हजार 634 कामगारांना घरे मिळाली. तिसऱया टप्प्यात 2 डिसेंबर 2016 रोजी 2 हजार 417 कामगार म्हाडाच्या घरात विसावले. आता मात्र चौथ्या टप्प्यात बॉम्बे डाईंग, श्रीनिवास गिरण्या आणि एमएमआरडीएच्या जागेवर बांधलेली अनुक्रमे 3 हजार 364, 482 आणि 1 हजार 244 अशी एकूण 5 हजार 90 घरे कामगारांना देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याचा सरकारला विसर पडू नये आणि लवकर लॉटरी काढण्यात यावी, अशी संघटनेची मागणी आहे.
गिरणी कामगारांच्या मुलांना गिरण्यांच्या जागेवर जो काही रोजगार उपलब्ध होईल, त्यामध्ये गिरणी कामगारांच्या मुलांना सामावून घेणाचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात झाला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही, याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे.





























































