आमदार निधीचा वापर आता दुष्काळग्रस्तांसाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

राज्यात सध्या दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी आता आमदार निधीचाही वापर करण्यास मुभा मिळणार आहे. आमदार निधीचा वापर दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून देण्याच्या दृष्टीने विशेष बाब म्हणून लवकरच शासन निर्णय जाहीर होणार आहे. आमदार निधीचा वापर दुष्काळग्रस्तांसाठी करण्याचा निर्णय नजीकच्या काळात प्रथमच घेतला जाणार आहे.

लोकसभा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार, आमदार, उमेदवार व जिल्हाध्यक्षांची बैठक दादर पूर्व येथील कार्यालयात आयोजित केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील-दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही चर्चा झाली.

या बैठकीनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दुष्काळाचा सामना करणारे गावकरी-शेतकरी यांच्यासाठी आमदार निधीतून पैसे खर्च करता यावे अशी आमदारांनी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार विशेष बाब म्हणून एक शासन निर्णय काढण्यात येईल. या निधीतून आमदार दुष्काळग्रस्त भागात पाण्याची टाकी, चारा छावणी व टँकर इत्यादीसाठी मदत करू शकतील.

भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीत राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रामुख्याने चर्चा झाली. भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी दुष्काळी भागाला भेट देणार आहेत. ते चारा छावणीला भेट देतील. गावातील पाणीटंचाईचा आढावा घेतील. सरकारने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्याच्या अंमलबजावणीचा आढावा लोकप्रतिनिधी घेतील व अडचणी दूर करतील असेही ते म्हणाले.

महायुतीच्या परिश्रमाला यश
राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम केले असून जनतेचा आशीर्वाद मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे युतीला मोठे यश मिळेल असे चित्र स्पष्ट झाले आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.