
कोस्टल रोडचे काम भरपावसातही सुरू राहण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. यासाठी नरीमन पॉइंट, प्रियदर्शिनी पार्क, अमरसन्स गार्डन आणि वरळी सी फेस या ठिकाणी कंट्रोल रूम सुरू करण्यात येणार असून नोडल ऑफिसरच्या माध्यमातून समन्वय साधला जाणार आहे. पाणी तुंबू नये यासाठी 50 ‘एचपी’ क्षमतेपर्यंतचे पंप ठिकठिकाणी बसवण्यात येणार असून आरोग्य सुविधांसह अॅम्ब्युलन्सही तैनात ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यातही कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू राहणार असून आतापर्यंत एकूण 30 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबईला वेगवान बनवणाऱया कोस्टल रोडचे काम सध्या महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक या 10.58 किमी लांबीचा हा मार्ग बांधण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोरोना काळातही आवश्यक काळजी-खबरदारी घेऊन कोस्टल रोडचे काम सुरू आहे. कामाचा वेग पावसाळ्यातही कायम ठेवून जुलै 2023 ची डेडलाइन पाळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून काम केले जात आहे. आपत्कालीन स्थितीसाठी कंट्रोल रूम तयार करून त्यांचा समन्वय पालिकेच्या प्रमुख आपत्कालीन विभाग, अग्निशमन विभाग, पोलीस यांच्याशी ठेवला जाणार आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना खबरदारी घेऊन कोस्टल रोडचे काम सुरू आहे.
‘तौकते’च्या परीक्षेत 100 टक्के!
या वर्षी मे महिन्यात मुंबईसह कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या ‘तौकते’ चक्रीवादळात 114 किमी ताशी वेगाने वारे वाहत होते. समुद्राला प्रचंड उधाण आल्याने उंच लाटा उसळत होत्या. 16 मे रोजी मुसळधार पाऊसही झाला. मात्र या आपत्कालीन स्थितीत प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे कोणतीही हानी किंवा दुर्घटना घडली नसल्याचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी सांगितले. ‘तौकते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा व्रेन, यंत्रे ‘डाऊन’ करून ठेवण्यात आली होती. प्रशासनाच्या नियोजनामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे ते म्हणाले.
‘मावळा’ने खोदला 352 मीटर बोगदा
- कोस्टल रोडच्या कामात 2.082 किमीचे दोन बोगदे खोदण्यासाठी महाकाय ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशीनने काम सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत 352 मीटर बोगदा खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे.
- तर सद्यस्थितीत मशीनचे आवश्यक कामही केले जात आहे. आऊट फॉलची सफाई करण्यात आली असून ठिकाणी पंप बसवण्यात येणार आहेत. सी-वॉलचे काम पूर्ण करून सुरक्षितता वाढवण्यात आली आहे.


























































