मुंबईत नालेसफाईची कामे अंतिम टप्प्यात,पालिकेची पावसाळापूर्व तयारी पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी अहोरात्र काम केले जात असताना पावसाळापूर्व कामेही आता पूर्ण होत आली असून आतापर्यंत नालेसफाईचे 90 टक्क्यांहून जास्त काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सखल भागांत अतिवृष्टीमुळे पाणी साचण्याच्या घटनांना आळा बसणार आहे.

मुंबई महानगरपालिका गेल्या वर्षभरापासून कोरोना रोखण्यासाठी अहोरात्र झटत आहे. यासाठी पालिकेने संपूर्ण यंत्रणा कामाला लावून जानेवारी अखेरपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट आल्याने पावसाळापूर्व कामांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र मुंबईकरांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी पालिकेची यंत्रणा वेगाने काम करीत आहे. या वर्षीच्या नालेसफाईसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. यामध्ये शहरातील ब्रिटिशकालीन नाल्यांची सफाई करण्यासाठी स्वयंचलित रोबोटिक सीसीटीव्ही कॅमेरा सोडून पाहणीनुसार काम केले जात आहे. अत्यंत महत्त्वाच्या अशा मिठी नदीच्या सफाईसाठी नदीच्या खोल भागात जाऊन गाळ काढण्यासाठी नेदरलॅण्डची टक्शर एम्फिबिअस मशीन तर नदीच्या कानाकोपऱयात जाऊन तरंगत्या कचऱयाची सफाई करणारी स्वीडनच्या सिल्ट पुशर मशीनचा वापर केला जात आहे.