
ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा 25 टक्के अधिक बरसात करणारा पाऊस अचानक मुंबईतून गायब झाला आहे. त्यामुळे तापमानवाढीने डोके वर काढून मुंबईकरांना घामाघूम करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी शहराच्या तापमानाने थेट 34 अंशांकर उसळी घेतली. कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंद झाले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर तापमानवाढ कायम राहणार आहे.
मागील दोन दिवसांपासून मुंबईत तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी कुलाब्यात 32.6 अंश, तर सांताक्रूझमध्ये 33.8 अंश इतके कमाल तापमान नोंद झाले. हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही अधिक म्हणजेच 70 ते 77 टक्क्यांच्या आसपास असल्याने अंगाची प्रचंड लाहीलाही सुरू झाली आहे, असे कुलाबा वेधशाळेने म्हटले आहे.





























































