गारव्याची पळवाट, मुंबईत ‘घाम’घमाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मान्सूनने मुंबई-महाराष्ट्रातून अजूनही अधिकृत एक्झिट घेतलेली नाही. अधूनमधून कुठे कुठे परतीचा शिडकावा सुरूच आहे. याचवेळी गारव्याने मुंबईतून पळवाट धरली असून उकाड्यात एकाकी वाढ झाली आहे. वातावरणातील या बदलामुळे मुंबईकर बेचैन झाले आहेत. पावसाळा संपत असताना नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’शी ऍडजस्ट व्हायला वेळच लागतो असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबई शहर व उपनगरातील अनेक भागांत परतीच्या पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. या पावसामुळे हवेतील गारवा वाढण्याऐवजी उकाडय़ात वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत कमाल तापमान 34 अंशांवर पोहचले असून सकाळच्या सुमारास 60 टक्क्यांच्या आसपास राहणारी हवेतील आर्द्रता दुपारी 85 टक्क्यांची पातळी गाठत आहे. पुढील दोन दिवसांत पारा ‘पस्तिशी’ची पातळी गाठेल, असाही अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

तापमानवाढ आणि हवेतील आर्द्रतेचे वाढते प्रमाण यामुळे मुंबईकरांना अस्वस्थ वाटत आहे. पुढील काही दिवस अशा प्रकारची अस्वस्थता जाणवेल. वातावरणातील या बदलाशी जुळवून घेण्यास नागरिकांना वेळ लागतो. – कृष्णानंद होशाळीकर (उपमहासंचालक, प्रादेशिक हवामान विभाग)