हार्बर, मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांवर पालिकेचा वॉच, पावसाळ्यापूर्वी तीन महिने आधीच पालिका सज्ज

मुंबईत वर्षभर सर्व आलबेल असताना पावसाळ्यात मात्र मुंबईची दाणादाण उडते. सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होतोच, पण रेल्वे स्थानकांलगत असलेल्या कल्व्हर्टचे पाणीही रुळांवर आल्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी विस्कळीत होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने नालेसफाईबरोबरच हार्बर, मध्य रेल्वे मार्गावरील कल्व्हर्टच्या साफसफाईवर वॉच ठेवला जात आहे. या पार्श्वभूमीवर तीन महिने आधीच मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी आज हार्बर आणि मध्य रेल्वे स्थानकांचा बैठकीत आढावा घेतला.

मुंबईत पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पाणी साचून रस्ते आणि रेल्वे विस्कळीत होत असते. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील छोटय़ा आणि मोठय़ा नाल्यांची साफसफाई केली जाते. मिठी नदीतील गाळ काढण्यासाठीही विशेष व्यवस्था करून पालिका नालेसफाई करते. गेल्या काही वर्षांपासून पालिका आणि रेल्वे अधिकारी जीवनवाहिनी विस्कळीत होऊ नये यासाठी एकमेकांशी समन्वय ठेवून आढावा बैठका, पाहणी दौरे करून वेळोवेळी माहिती घेत आहेत.

मानखुर्दमधील उदंचन केंद्राची साठवण क्षमता वाढवणार

मानखुर्द महाराष्ट्रनगर सब वे येथील लघु उदंचन केंद्रात 5 बाय 5 मीटर क्षमतेची साठवण टाकी (पंप) आहे. या साठवण टाकीची क्षमता 15 बाय 6 मीटर करणे आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वेच्या जमिनीवर बांधकाम करावे लागणार आहे. रेल्वे विभागाशी समन्वय ठेवून निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण केली तर 31 मे 2025 पर्यंत हे काम पूर्ण केले जाऊ शकते.

  • चुनाभट्टी रेल्वे स्थानकाबाबत पर्जन्य जलवाहिन्या विभाग हायवे सोसायटीकडून येणारे पावसाळी पाणी दोन उच्च क्षमतेचे पंप लावून नाल्यामध्ये सोडण्यात येणार आहे.
  • माटुंगा येथे रेल्वे विभागाकडून रुळांखालून पावसाळी जलवाहिनी विस्तारीकरणाचे काम सुरू आहे, मात्र त्याची लांबी 800 मीटरपर्यंत वाढवली गेली तर त्यामुळे अधिक फायदा होईल, असे पालिकेचे म्हणणे आहे.
  • उषानगर (भांडुप) येथे पूल विभागामार्फत पूल/कल्व्हर्टचे काम सुरू आहे. त्या ठिकाणची समांतर जलवाहिनी स्थलांतरित करून छोटा पूल पाडणे आत्यंतिक आवश्यक आहे. नाहीतर गेल्या वर्षाच्या पावसाप्रमाणे यंदादेखील पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. 15 मे 2025 पर्यंत जलवाहिनी स्थलांतर केली जाईल तसेच जीर्ण पूल पाडण्याची दक्षता घेतली जाईल, असे पूल विभागाच्या अधिकाऱयांनी नमूद केले.