
मुंबईत उदरनिर्वाहासाठी आलेल्या कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबई महापालिका ‘सिग्नल शाळा’ ही आगळीवेगळी संकल्पना राबवणार आहे. या सिग्नल शाळात सुमारे 100 मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या शाळेत सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पहिली शाळा सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाखाली अमर महल (चेंबूर) येथे सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
स्थलांतरित किंवा बेघर कुटुंबीय आणि लहान मुले ही उदरनिर्वाहासाठी सिग्नल, उड्डाणपुलाखाली तसेच चौकाच्या ठिकाणी उघडय़ावर राहतात. त्या दृष्टीने समर्थ भारत व्यासपीठ स्वयंसेवी संस्थेने 2018 मध्ये ठाणे येथील तीन हात नाका येथे ‘सिग्नल शाळा’ सुरू केली होती. सिग्नलजवळच्या बेघर विद्यार्थ्यांना एकत्र आणून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी ही संस्था काम करते. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षण घेतानाच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षणही घेतले आहे. मुंबईतील बेघर मुलांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षणाची सुविधा, बौद्धिक विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठीची संधी देणारी ‘सिग्नल शाळा’ उभारण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. इकबालसिंह चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. जिल्हा नियोजन समिती (मुंबई उपनगर)च्या निधीतून या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
शाळेत अत्याधुनिक साधनसामग्री
मुंबईत पूर्व उपनगरामध्ये बेघर मुलांसाठीच्या झालेल्या सर्वेक्षणानुसार चेंबूर येथील अमर महाल येथे महापालिकेच्या नियोजन विभागाने सिग्नल शाळेसाठी जागा शोधली. या शाळा उभारणीसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. शाळेमध्ये अत्यावश्यक साधनसामग्री, विज्ञान प्रयोगशाळेतील उपकरणे आणि साधनसामग्री, संगणक, प्रिंटर्स तसेच शाळेशी निगडित इतर बाबींचा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
सिग्नल शाळांमधील अधिकाधिक अद्ययावत सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या शाळांच्या माध्यमातून करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसोबतच कुटुंबाच्या सामाजिक प्रगतीचा प्रयत्नही या पुढाकाराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.


























































