‘पिचकारी’ अडीचशेला पडणार, उघडय़ावर घाण केल्यास पाचशेचा फटका

मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पालिका आता अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे. यामध्ये दंडाची रक्कम दुपटीने वाढवण्यात आली आहे. यानुसार आता उघडय़ावर ‘पिचकारी’ मारल्यास 250 रुपये भरावे लागणार आहेत. तर उघडय़ावर घाण केल्यास 500 रुपयांचा दंड होणार असून रस्त्यावर बेकायदेशीरपणे डेब्रिज फेकल्यास तब्बल 20 हजारांचा दंड केला जाणार आहे.

मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेच्या सफाई विभागाचे 30 हजारांवर कर्मचारी अहोरात्र काम करीत असतात. मात्र यानंतरही काही उपद्रवी नागरिकांकडून उघडय़ावर घाण केली जाते. त्यामुळे मुंबईमध्ये घाण करणाऱ्यांवर नजर ठेवणाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे आहे.

n सद्यस्थितीत पालिकेकडे क्लीन-अप मार्शल नसल्याने ‘उपद्रव शोधकां’कडून घाण करणाऱ्यांवर नजर ठेवली जाणार आहे. पालिकेकडे सध्या 110 पदे आहेत. त्यांची नेमणूक सर्व 24 वॉर्डमध्ये गरजेनुसार केली जाणार असून घाण करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जाईल. शिवाय ही कारवाई करण्यासाठी ‘उपद्रव शोधकां’ची भरतीदेखील केली जाणार आहे.

असा होणार दंड

n उघडय़ावर थुंकणाऱ्यांना आतापर्यंत 200 रुपये करण्यात येणारा दंड आता 250 करण्यात येणार आहे. तर मूत्र, शौच, कचरा फेकणे आणि  स्वच्छता करणाऱ्यांना याआधी आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम 200 वरून 500 रुपये केली जाणार आहे.

n सार्वजनिक ठिकाणी भांडी धुतल्यास 300 रुपये, गाडय़ा धुतल्यास 1000 हजार, घराचा नाला अस्वच्छ ठेवल्यास 500 रुपये, कोरडा कचरा वेगळा करून न दिल्याबद्दल 200 रुपयांचा दंड आकारण्यात येईल.