मुंबई-नाशिक झाला मृत्यूचा महामार्ग, 11 महिन्यांत 53 बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-नाशिक महामार्गावर वारंवार होणाऱया अपघातांमुळे या महामार्गाची ओळख मृत्यूचा महामार्ग म्हणून होऊ लागली आहे. भरधाव वेग आणि महामार्गावरील खड्डे यामुळे गेल्या अकरा महिन्यांत 109 अपघात झाले असून 53 जणांचे बळी गेले आहेत, तर 107 प्रवासी जखमी झाले आहेत. एकीकडे प्रवाशांचे हकनाक बळी जात असताना ठेकेदार कंपनी केवळ टोलवसुलीत मग्न असून रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

गेल्या आठ दिवसांत मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटना घडल्या आहेत. या महामार्गावरील अपघातांची शृंखला सुरूच राहिली आहे. सोनाळे (पडघा) ते चिंतामणवाडी (कसारा) या 71 किलोमीटरच्या अंतरामध्ये 2019 च्या जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांत 109 भीषण अपघात घडले आहेत. या अपघातात 53 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 107 जण जखमी झाल्याची महामार्ग पोलिसांकडे नोंद आहे. विशेष म्हणजे या 71  किलोमीटरच्या अंतरामध्ये  सर्वसुविधांयुक्त रुग्णालयाचा अभाव असल्याने उपचाराअभावी अपघातग्रस्तांची फरफट होते. शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाचीदेखील तज्ञ डॉक्टरांअभावी दारुण अवस्था असल्याने प्राथमिक उपचार करून रुग्ण पुढे हलविण्यात येतात. त्यामुळे वेळीच उपचार मिळत नसल्याने प्रवाशांचा बळी जातो.

तोपर्यंत ‘वसुली’ बंद करा!

महामार्गाची संपूर्ण माहिती नसताना वेगात वाहन चालवणे, रस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहने, रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करणे, कोणतीही पूर्वकल्पना न देता वाहन दुसऱया बाजूला नेणे, हेल्मेट अथवा सीटबेल्ट न वापरता वाहन चालवणे या कारणांमुळे अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-नाशिक या महामार्गावरील खड्डय़ांकडे देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या कंपनीने तातडीने लक्ष देण्याची गरज असून तोपर्यंत टोलनाके बंद ठेवण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.