
जाहिरातींच्या होर्डिंगसाठी झाडे तोडण्याचे प्रकार लक्षात घेऊन मुंबईत नवीन होर्डिंग पॉलिसी आणण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वरळी येथे विषारी इंजेक्शन देऊन झाडांचा बळी घेणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी केस दाखल केली असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
वरळी सी फेसवरील हॉटेल ब्ल्यू सी परिसरात मुंबई महापालिकेची शाळा व सरकारी वसाहत आहे. या भागातील होर्डिंग एका खासगी कंत्राटदाराला दिले आहे. या होर्डिंगवरील जाहिरात व्यवस्थित दिसण्यासाठी या भागातील माड व अन्य काही झाडांना विषारी इंजेक्शन देऊन झाडांची कत्तल केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी महापालिकेतही तक्रार दाखल करण्यात आली होती.






























































