‘सावली’ इमारतीचा ‘बीडीडी’ पुनर्विकासात पुन्हा समावेश करा, आदित्य ठाकरे यांची विधानसभेत मागणी

वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात ‘सावली’ इमारतीचा पुन्हा समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासांतर्गत सावली इमारतीचा समावेश करण्यात आला होता; परंतु आता या इमारतीला बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातून काढले असल्याचे कानावर येत आहे. ठरावीक लोक पात्र होते. त्यांना तिथे घरे मिळायला हवीत. त्याचा बीडीडीवर फारसा काही मोठा फरक पडणार नाही, असे सांगत ‘सावली’ इमारतीचा पुनर्विकासात समावेश करण्याबाबत आदित्य ठाकरे यांनी विनंती केली.

निवृत्त पोलिसांना मुंबईतच घरांसाठी जागा द्या

वरळीत शासकीय कर्मचारी, अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्यावर संकटाचं सावट आहे, असे नमूद करत आदित्य ठाकरे यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले. पोलीस वसाहतींमध्ये निवृत्तीनंतर राहणाऱया पोलिसांना सद्यस्थितीत मोठा दंड आकारला जात आहे. शिवाय वरळी कॅम्पमधील अशा पोलिसांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ती थांबवण्यात यावी. त्यांना आकारला जाणाऱया दंडाची रक्कम कमी करावी, निवृत्त पोलिसांना स्वतःची सोसायटी बनवण्याचा अधिकार द्यावा, त्यांना मुंबईतच घरांसाठी जागा दिली जावी अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.