निवृत्त बँक अधिकाऱ्याची फसवणूक; एकाला अटक

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली निवृत्त बँक अधिकाऱ्याची 51 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी एकाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. वसीम शेख असे त्याचे नाव आहे. त्याला काही रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती.

गोरेगाव येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जोडले गेले. त्या ग्रुपवर शेअर ट्रेडिंगची माहिती दिली जात होती. ग्रुप अ‍ॅडमिनने त्यांना पह्न करून शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना एक अ‍ॅप्स डाऊनलोड करून वैयक्तिक आणि बँक खात्याची माहिती अपलोड करण्यात सांगितली. त्यानंतर त्यांनी शेअरमध्ये 30 लाख 65 हजार 450 रुपयांची गुंतवणूक केली. याच दरम्यान त्यांना अन्य एका साईटवर शेअर ट्रेडिंगची जाहिरात दिसली. त्यावर क्लिक केल्यावर ते दुसऱ्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर जोडले गेले. जास्त नफा मिळेल या हेतूने त्यांनी 21 लाख 25 हजार रुपयांची गुंतवणूक केली.

गुंतवणूक केलेल्या पहिल्या कंपनीत 1 कोटी 46 लाख 84 हजार, तर दुसऱ्या कंपनीत 1 कोटी 23 लाख 38 हजार रुपयांचा नफा दिसून आला. ही रक्कम बँक खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी ग्रुप अ‍ॅडमिनला संपर्क केला. तेव्हा त्याने टॅक्स म्हणून आणखी काही रक्कम जमा केल्याशिवाय ती रक्कम बँक खात्यात जमा करता येणार नाही असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्याने त्यांचे फोन घेणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.