जे मनात घोळत असेल ते जगाला सांगा! यशवंतराव चव्हाणांची पणती अमायराचे युवा लेखकांना आवाहन

‘तुमच्या मनात जे घोळत असेल ते जगाला सांगा. बेधडकपणे सांगा. तुम्ही व्यक्त होणं गरजेचं आहे,’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पणती युवा लेखिका अमायरा चव्हाण हिने तरुणांना केले.

अवघ्या 11 वर्षांच्या अमायरा चव्हाण हिने बालसाहित्याच्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. तिच्या ‘द ट्रेल डायरीज’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अमायराने आपले मनोगत व्यक्त केले.

‘लेखन तुमच्या कल्पनाशक्तीला उभारी देतं. तुमच्यातील अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळवून देतं. त्यामुळं तुमच्या मनात एखादी कथा घोळत असेल, तर ती बेधकडपणे जगाला सांगा. बेधडकपणे व्यक्त होणं गरजेचं आहे. मला व्यक्त होण्यासाठी अनेकांनी प्रोत्साहन दिलं. त्यात माझे आई-वडील आणि इतरही अनेक लोक होते. त्या सगळ्यांचे मी आभार मानते,’ असे अमायरा म्हणाली. अमायराच्या पुस्तकाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

पुस्तकाचा पुढचा भाग लवकरच

अमायराच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी प्रकाशन सोहळ्याला साहित्याच्या क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी, लेखिका रीता राममूर्ती गुप्ता, बाल साहित्यिक राजीव तांबे उपस्थित होते. अमायराच्या पुस्तकाचे पुढील भाग लवकरच येतील, असा विश्वास राजीव तांबे यांनी क्यक्त केला. अमायराच्या लेखनशैलीने मी प्रभावित झाले, असे रीता राममूर्ती गुप्ता म्हणाल्या.