खासगीकरण नकोच! पालिका कर्मचाऱ्यांची आजपासून उपायुक्तांच्या कार्यालयांवर धडक

मुंबई महापालिकेतील सफाई व परिवहन खात्याच्या तसेच पालिका रुग्णालयांच्या खासगीकरणाविरोधात सोमवार 23 ते सोमवार 30 जूनपर्यंत पालिका कर्मचारी परिमंडळनिहाय उपायुक्तांच्या कार्यालयांवर धडक देणार आहेत. महापालिकेतील कामगार संघटनांची संघर्ष समिती याचे नेतृत्व करणार असून यात हजारो कर्मचारी सहभागी होणार आहेत. दर दिवशी सकाळी 11 वाजता ही निदर्शने केली जाणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कर्मचारी कचरा गोळा करणे, तो वाहनातून वाहून नेणे ही कामे व्यवस्थितपणे करत असतात. मात्र आता हीच कामे कंत्राटदाराकडून करून घेण्यासाठी सेवाधारित (सर्व्हीस बेसड्) सेवा पुरवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. ही कामे कंत्राटदारांकडून करून घेण्यात आली तर पालिकेला सर्वस्वी कंत्राटदारावरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे पालिकेची स्वायत्तता धोक्यात येणार आहेच; पण हे एक प्रकारे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याचे टप्प्याटप्प्याने केले जाणारे खासगीकरण आहे. संभाव्य खासगीकरणाविरुद्ध महामोर्चा काढण्यात आला होता. मात्र आयुक्तांनी ठोस आश्वासन न दिल्यामुळे सोमवारपासून संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली कर्मचारी निदर्शने करणार आहेत. खासगीकरणाच्या निविदा मागे घेतल्या नाही तर 1 जुलैपासून पालिका कामगार बेमुदत संपावर जातील. त्यामुळे होणाऱया त्रासाला सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांनी दिला आहे.

या कार्यालयांवर देणार धडक

परिमंडळ-1, उपायुक्त कार्यालय, भायखळा, परिमंडळ -2, उपायुक्त कार्यालय, परळ, परिमंडळ-3, उपायुक्त कार्यालय, अंधेरी (पूर्व), परिमंडळ-4, उपायुक्त कार्यालय, अंधेरी (पश्चिम), परिमंडळ-5, उपायुक्त कार्यालय, चेंबूर, परिमंडळ-6, उपायुक्त कार्यालय, घाटकोपर, परिमंडळ-7, उपायुक्त कार्यालय, बोरिवली.