बेस्ट कर्मचार्‍यांची दिवाळी गोड; शिवसेनेच्या दणक्यानंतर बोनस मंजूर

‘मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी’ असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी दिवाळी बोनसची गुड न्यूज मिळाली. बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत प्रशासनाची चालढकल सुरू होती. त्याविरोधात शिवसेनेने गुरुवारी वडाळ्यात तीव्र निदर्शने केली. शिवसेनेच्या त्या दणक्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. बेस्ट कामगार सेनेच्या आंदोलनाची दखल घेत बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनसचे वाटप करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यात 31000 रुपये बोनस म्हणून जमा करण्यात आले आहेत. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी वडाळा आगाराबाहेर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने कार्यवाहीला गती दिली.

बेस्ट कामगार सेनेने 7 ऑक्टोबर 2025 रोजी बेस्टे महाव्यवस्थापक आणि महापालिकेचे आयुक्त यांची भेट घेऊन दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना बोनसचे वाटप करण्याची मागणी केली होती. मात्र बेस्ट आणि महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या उदासिन धोरणाविरोधात बेस्ट कामगार सेनेने गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी वडाळा आगाराबाहेर तीव्र निदर्शने केली. बेस्ट कर्मचाऱ्यांना तातडीने बोनस द्या अन्यथा रस्त्यावर उतरून चक्काजाम करून, असा इशारा बेस्ट कामगार सेनेने दिला होता. बेस्ट कामगार सेनेच्या दणक्यानंतर अखेर बेस्ट आणि महापालिका प्रशासनाने नरमले. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी 31000 रुपये बोनस जमा करण्यात आला.