
चारकोप विधानसभेच्या मतदार यादीत भाजप वार्ड अध्यक्ष संतोष जाधव यांचे तीन वेळा नाव असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे नाव असलेल्या सर्व ठिकाणी त्यांनी मतदान केल्याची माहिती पुढे आली होती. त्यापाठोपाठ चारकोपच्या मतदार यादीत चक्क मतदारांची नावे गुजराती, बंगाली, उडिया आणि तामीळ भाषेत छपाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे यापूर्वीच आढळून आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी मतदारांची दुबार-तिबार नावे, मयत तसेच चुकीची व एकाच पत्यावर अनेक मतदारांची नावे नोंदविल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांदीवली येथील चारकोप मतदार संघाच्या मतदार यादीची पडताळणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
चारकोपच्या मतदार यादीत अनेक मतदारांची नावे मराठीऐवजी गुजराती, बंगाली, ओडिया आणि तामिळ भाषेत नोंदविण्यात आली आहेत. एका मतदाराचे नाव मराठीत आहे, तर त्याच मतदाराचे नाव दुसरीकडे ओडिसा आणि तमिळ भाषेत आहे. एका मतदाराचे नाव चौबार नमूद असून त्या मतदाराच्या नावात चारही ठिकाणी तफावत जाणवत आहे. एका मतदाराचे नाव मतदार तिबार असून दोन ठिकाणी नाव समान आहे व तिसऱ्या ठिकाणी नावा समोर वडिलांचे छायाचित्र आहे. मराठी ऐवजी परभाषेत मतदारांची नावे छापण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
मतदार यादीतील घोळाची चौकशी करा – मनसे
चारकोपच्या मतदार यादीतील मराठी भाषेऐवजी अन्य भाषांत छापलेलेली नावे दुरुस्त करण्यात यावी. तसेच मतदार यादीत इपिक कोड वेगवेगळे कशे या प्रकरणाची कायदेशीर चौकशी करून दोषींवर कडक कारवाईकरण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
काँग्रेसच्या अस्लम शेख यांचे नाव चारकोपच्या यादीत
मालाड (प) विधानसभेचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचे नाव चारकोपच्या मतदार यादी भागात दोन वेळा फोटोसह आढळून आले आहे. नगरसेवक, तीन वेळा आमदार, निवडणुकीच्या वेळी मतदार यादीतील नाव का तपासले नाही? ही चूक निवडणूक आयोगाची असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
इपिक कोड वेगवेगळे
2008 पूर्वी चारकोप विधानसभा 44 चारकोप कांदिवली विधानसभा म्हणून ओळखली जायची. त्यावेळी मतदार यादीतील इपिक नंबरसाठी DWJ हा कोड देण्यात आला होता. 2008 नंतर 161 चारकोप विधानसभा असे नाव झाल्यानंतर AVE असा इपिक कोड देण्यात आला आहे. त्यामुळे चारकोपच्या मतदार यादीत DWJ आणि AVE इपिक कोड नंबर ने मतदारांचे नावे समाविष्ट आहेत. परंतु काही मतदारांचे इपिक कोड हे TZB, THQ, NLF, XWC असे असून ते अन्य मतदारसंघाचे असल्याचे दिसून येत आहेत.
मतदार यादीत असा गोंधळ
- मतदारांची नावे हिंदू असून छायाचित्रात मुस्लिम महिला दिसत आहे.
- मतदार यादीत काही महिलाच्या नावापुढे पुरुषांचे छायाचित्र दिसत आहे.
- एकाच वास्तव्याच्या ठिकाणी मराठी, उत्तर भारतीय, गुजराती, मुस्लिम मतदारांची नावे आहेत.



























































