बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल, ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचा खोळंबा; बस थांब्यांवर प्रचंड गर्दी

बेस्ट उपक्रमातील कंत्राटी चालक-वाहकांनी ऐन परीक्षांच्या काळात मंगळवारी प्रलंबित मागण्यांसाठी लाक्षणिक संप पुकारला. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरांतील बेस्ट बससेवा विस्कळीत झाली. अनेक गाडय़ा आगारांमध्येच उभ्या राहिल्याने मुंबईकरांची प्रचंड गैरसोय झाली. विद्यार्थी, महिला तसेच वृद्ध नागरिकांसह इतर प्रवाशांचा भरउन्हात जागोजागी खोळंबा झाला. बस थांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी, लांबलचक रांगा लागल्या.

‘समान काम, समान काम’ तसेच इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कंत्राटी चालक-वाहकांनी संप पुकारला. सध्या दहावीची परीक्षा सुरू असून याच काळात ‘काम बंद’ आंदोलन करीत कंत्राटी चालक-वाहकांनी आझाद मैदान गाठले. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यातील जवळपास 2500 बसेस आगारांमध्येच उभ्या राहिल्या. याचा नोकरदारांसह परीक्षांना चाललेले विद्यार्थी, लहान मुलांसह प्रवास करणाऱया महिला तसेच वयस्कर मंडळींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आझाद मैदानातील मोर्चेकरांनी सकाळी घोषणा देत बेस्ट प्रशासनाचे प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात सार्वजनिक बस सेवा देण्यासाठी कायमस्वरूपी सेवेत असलेल्या कर्मचाऱयांप्रमाणेच आम्ही काम करीत आहोत. त्यामुळे कायम व नियमित कामगारांना लागू असलेले वेतन, रजा, वैद्यकीय भत्ता, महागाई भत्ता आदी विविध प्रकारचे लाभ कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱया चालक-वाहकांना द्या, अशी मागणी आझाद मैदानातील आंदोलनात करण्यात आली. सायंकाळी युनियनतर्फे पालिका आयुक्तांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.

बेस्ट कामगार सेना मदतीला धावली

कामगारांच्या काम बंद आंदोलनानंतर बेस्ट कामगार सेनेने संपाचा विद्यार्थ्यांना फटका बसू नये याची काळजी घेत शक्य तितक्या अधिकाधिक बसेस चालवण्याला प्राधान्य दिले. वेटलीज कंपन्या मुंबईकरांच्या सेवेबाबत बेफिकीर आहेत. त्या कंपन्या कामगारांकडे दुर्लक्ष करीत असल्याने वारंवार काम बंद आंदोलन पुकारले जाते. सरकारने याचा गांभीर्याने विचार करीत वेटलीज कंपन्यांच्या बसेस बंद कराव्यात व बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या 4000 गाडय़ा आणाव्यात, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केली.