
दक्षिण मुंबईतील वाहतूककोंडी फोडणाऱया कर्नाक ब्रीजचे काम गेल्या महिनाभरापासून पूर्ण झाले असताना पालिका हा पूल सुरू करण्यास दिरंगाई करीत आहे. यामुळे दररोजची वाहतूककोंडी आणि तासन्तास होणारी रखडपट्टी यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाच्या निक्रियतेचा निषेध करीत आज दक्षिण मुंबईत शिवसेना विभाग क्र. 12 आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एकत्रितरीत्या जोरदार आंदोलन करण्यात आले.
कर्नाक ब्रीज परिसरात अनेक शाळा-कॉलेज आणि रुग्णालये असल्यामुळे अपेक्षित जागी पोहोचण्यासाठी नागरिकांची कोंडी होत आहे. त्यामुळे हा पूल तातडीने सुरू करण्याची मागणी यावेळी शिवसेना-‘मनसे’च्या वतीने करण्यात आली. यावेळी विभागप्रमुख संतोष शिंदे, महिला विभाग संघटक युगंधरा साळेकर, विधानसभा प्रमुख विकास मयेकर, मनसेचे उपाध्यक्ष अरविंद गावडे, विभाग अध्यक्ष बबन महाडिक, महिला विभाग अध्यक्ष प्रिया पडवळकर, विकास आडुळकर, वैभव शिंदे यांच्यासह मोठया संख्येने शिवसैनिक-मनसैनिक उपस्थित होते.
…असे होताहेत नागरिकांचे हाल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिसन परिसरात कोणत्याही कामासाठी पोहचताना मेट्रोवरून जेजे ब्रिज व फ्रीवे मार्गाला जाण्यासाठी दीड दीड तासाचा वेळ वाया जात होता. त्याचप्रमाणे मांडवी मस्जिद बंदर या ठिकाणी वाहने तासन्तास अडकून पडत असल्याने परिसरातील रहिवाशांना कर्णकर्कश आवाजाचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे ध्वनिप्रदूषणही वाढते. यामुळे आंदोलन केल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यातही घेतले.